शिरगाव शिंदेवाडी येथील घटना; पनवेल येथील आरती शिंदे आणि दिपक शिंदे यांच्याविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद.
देवगड,दि.२२ जुलै
शिरगाव शिंदेवाडी येथे कौटुंबिक वादातून महिलेला धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी पनवेल येथील आरती दिपक शिंदे (वय ५०) व दिपक वसंत शिंदे (वय ५२) या संशयिताविरूद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शिरगाव शिंदेवाडी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत महिलेची आई मयत झाल्याने ती आपल्या माहेरी शिरगाव शिंदेवाडी येथे राहण्यास गेली होती. दिवसकार्य सुरू असल्याने सर्व नातेवाईक तेथे घरी आले होते. यावेळी संशयित आरती शिंदे हिने पीडीतेला आईच्या मालकीचे घर मला हवे. तुम्ही येथून निघून जा, असे सांगून वाद घातला. संशयितेने पीडीतेच्या अंगावर धावत येवून कुटूंबाला शिवीगाळ करून हात पाय तोडून टाकेन अशी धमकी दिली. तर संशयित दिपक शिंदे यांने पीडीता व तिच्या बहिणीच्या अंगावर धावत जावून तुम्हाला व कुटूंबियांना खपवून टाकेन अशी धमकी दिली. तसेच पीडितेला अश्लील शिवीगाळ केली. याबाबत पीडीतेने देवगड पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार देवगड पोलिसांनी संशयितांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास महिला पोलिस हवालदार सविता लाड करीत आहेत.