दोडामार्ग, दि. २३ जुलै
साटेली-भेडशी येथील महावितरणच्या सहाय्यक अभियंता शाखा कार्यालय गेल्या २० ते २५ दिवसांपासून बंद असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कार्यालयावर सतत कुलूप असल्याने वीज ग्राहकांना विविध कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची तक्रार करण्यात आली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने नागरिकांनी महावितरण कार्यालयासमोर एकत्र येत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आणि कार्यालय नियमित सुरू करण्याची मागणी केली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वीजपुरवठ्यातील बिघाड, वाढीव वीजबिलांबाबतच्या तक्रारी, नवीन वीजजोडणी, मीटरसंबंधित कामे तसेच इतर तांत्रिक अडचणींसाठी ग्राहकांना या कार्यालयावर अवलंबून राहावे लागते. मात्र, गेल्या २० ते २५ दिवसांपासून कार्यालय बंद असल्याने कोणताही अधिकारी अथवा कर्मचारी उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी अनेक कामे रखडली असून ग्राहकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत.