परराज्यातील ट्रॉलर्सकडून महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत मासळीची लूट होण्याची भीती; शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात – हरी खोबरेकर
मालवण,दि.०३ जुलै
महाराष्ट्रातील मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आला असताना, शेजारील गोवा, कर्नाटक आणि गुजरात राज्यांमध्ये ही बंदी ३० जुलैलाच संपणार आहे. या विसंगतीमुळे परराज्यातील ट्रॉलर्स महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसून मासळीची मोठ्या प्रमाणात लूट करतील, अशी भीती व्यक्त करत ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी शासनाला याबाबत ठोस उपाययोजना जाहीर करण्याची मागणी केली आहे.
खोबरेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत होता. मात्र, शेजारील राज्यांशी सुसंगतता राखण्यासाठी आणि स्थानिक मच्छिमारांचे नुकसान टाळण्यासाठी तो ३० जुलैपर्यंत करण्यात आला होता. आता शासनाने पुन्हा एकदा बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविल्याने महाराष्ट्रातील मच्छिमारांना अतिरिक्त १५ दिवस समुद्रात जाता येणार नाही.
दुसरीकडे, शेजारील राज्यांमधील बंदी ३० जुलैलाच संपत असल्याने १ ऑगस्टपासून तेथील शेकडो ट्रॉलर्स महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मासेमारीसाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील मच्छिमारांच्या हक्काच्या सागरी संपत्तीवर परराज्यातील ट्रॉलर्स डल्ला मारतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
“जर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील मासळीच परराज्यातील ट्रॉलर्ससाठी खुली होणार असेल, तर राज्यातील मच्छिमारांना वाढीव बंदीचा नेमका काय फायदा?” असा सवालही खोबरेकर यांनी उपस्थित केला आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री यांनी केंद्रीय स्तरावर तसेच संबंधित राज्यांशी समन्वय साधून तेथील मासेमारी बंदीचाही कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच वाढीव बंदीच्या १५ दिवसांत परराज्यातील यांत्रिक नौका आणि हायस्पीड ट्रॉलर्सना महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग, सागरी पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी विशेष गस्त, कडक तपासणी व प्रभावी कारवाई करावी. राज्यातील मच्छिमारांचे हित जपण्यासाठी शासनाने तातडीने ठोस धोरण जाहीर करावे, अशी मागणीही हरी खोबरेकर यांनी केली आहे.