भारुड आणि भजनातून तरुण पिढीला दिशा देण्याची गरज;हिंदू जनजागृती भारुड महोत्सव २०२६ उत्साहात..
कणकवली,दि.०९ ऑगस्ट
देशविघातक शक्तींना रोखण्यासाठी तसेच राष्ट्राला सर्वांगीण विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी तरुण पिढीचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. भारुड महोत्सव आणि भजनाच्या माध्यमातून हे प्रबोधन प्रभावीपणे करता येईल. अशा उपक्रमांमधून तरुण पिढीला योग्य दिशा देण्याचे काम होईल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्यात प्रथमच कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथे कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था, कणकवली यांच्या वतीने आयोजित हिंदू जनजागृती भारुड महोत्सव २०२६ कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर, कणकवली सभापती हर्षदा वाळके, जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर, मनोज रावराणे, कलाकार समिती जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, भजन समितीचे अध्यक्ष बुवा प्रकाश पारकर, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, तोंडवली-बावशी सरपंच मनाली गुरव, उद्योजक विशाल कामत, असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर यांच्यासह तालुक्यातील भजन सांप्रदायिक संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, “भजनी संस्थेचे पदाधिकारी माझ्याकडे आले आणि त्यांनी भारुड महोत्सवाची संकल्पना मांडली. माझ्या जिल्ह्यात भारुड महोत्सव होत असेल आणि त्यातून समाजप्रबोधन होत असेल, तर महाराष्ट्रातील पहिला भारुड महोत्सव नांदगाव येथे घ्यावा, अशी भूमिका मी मांडली. हा सुंदर महोत्सव येथे होत आहे. भविष्यात दरवर्षी आपल्या जिल्ह्यातील विविध गावांमध्ये अशा प्रकारचे भारुड महोत्सव आयोजित झाले पाहिजेत. महोत्सव कोणत्या गावात घ्यायचा, त्या गावाची निवड करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवा,” असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केला.

आजूबाजूला घडणाऱ्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर समाजात जागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे. समाजप्रबोधनाच्या माध्यमातून तरुण पिढीमध्ये संस्कार, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रनिष्ठा निर्माण करण्यासाठी भारुडासारखी पारंपरिक कला प्रभावी माध्यम ठरू शकते, असेही मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
या महोत्सवात नामवंत १२ बुवांनी सहभाग घेत विविध आध्यात्मिक कथा, भारुडे आणि सादरीकरणाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. पारंपरिक कला आणि अध्यात्माच्या माध्यमातून उपस्थितांना सामाजिक संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव बुवा निलेश ठाकूर यांनी केले. सूत्रसंचालन श्री. खानोलकर यांनी केले, तर आभार भजन समितीचे अध्यक्ष बुवा प्रकाश पारकर यांनी मानले.
