नांदगाव येथे राज्यातील पहिला हिंदू जनजागृती भारुड महोत्सवाचा शुभारंभ ; भजन कलाक्षेत्रातील विविध बुवांनी भारुडामधुन केली जनजागृती
कणकवली ,दि.०९ ऑगस्ट
कोकणातील भजन संस्कृती ही समाजाला प्रबोधन करणारी आहे. अनेक पिढ्यांपासून भजनांमुळे संघटीतपणा व एकात्मता गावागावांमध्ये टीकून राहिली आहे. समाजाला भक्तीच्या माध्यमातून परमेश्वराशी जोडण्याबरोबरच चांगले व आध्यात्मिक जीवन जगण्याची प्रेरणा देणाऱ्या संत परंपरेचा वारसा जपण्यासाठी भारुड महोत्सवाचे आयोजन कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन कणकवली सभापती हर्षदा वाळके यांनी केले.
कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथे कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था, कणकवली यांच्या वतीने आयोजित हिंदू जनजागृती भारुड महोत्सव २०२६ चा शुभारंभ सभापती हर्षदा वाळके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तर उद्योजक रामू विखाळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, कलाकार समिती जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर, भजनी संस्थेचे अध्यक्ष बुवा प्रकाश पारकर, सचिव निलेश ठाकूर, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, बेळणे सरपंच अविनाश गिरकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, माजी सरपंच पंढरी वायंगणकर, कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर, आयनल माजी सरपंच बापू फाटक, हेमंत परुळेकर यांच्यासह तालुक्यातील भजन सांप्रदायिक मंडळांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा व भजन सेवा करणाऱ्या बुवांचा सत्कार करण्यात आला.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले,आज सोशल मीडिया आणि मोबाईलच्या स्पर्धेच्या युगात समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी भारुडासारख्या पारंपरिक लोककलेची नितांत गरज आहे. संत एकनाथ महाराजांनी सुमारे ३०० भारुडांच्या माध्यमातून समाजप्रबोधन व परिवर्तनाचे महान कार्य केले. त्याच परंपरेला पुढे नेण्याचे काम आजच्या पिढीने करण्याची गरज आहे. भारुड, गवळण आणि पारंपरिक भजनाच्या माध्यमातून पौराणिक कथा, अध्यात्म, धर्म आणि समाजप्रबोधनाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत सहज पोहोचवता येतात. एखादा मोठा ग्रंथ वाचण्यासाठी बराच वेळ लागतो. मात्र भारुडाच्या माध्यमातून त्यातील आशय लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवता येतो. त्यामुळे भारुड महोत्सव आयोजन केल्याबद्दल भजनी संस्थेचे कौतुक आहे.
यावेळी उपसभापती सोनू सावंत , जि.प.सदस्य संतोष पारकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव बुवा निलेश ठाकूर यांनी केले. सूत्रसंचालन श्री. खानोलकर यांनी केले, तर आभार नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांनी मानले.
