कणकवली दि.२५ जुलै
सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल, महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, सिंधुदुर्ग आणि स्वामी समर्थ मठ, दिगवळे यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा गुरुवार, २३ जुलै रोजी दिगवळे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात हेलन केलर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या, गरजा तसेच त्यांना आवश्यक सहकार्य मिळावे, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साईकृपा संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करत विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

यावेळी रमेश गावडे, राजेंद्र मेस्त्री यांनीही दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी दिव्यांग बांधवांसाठी आवश्यक साहित्याची नोंदणी करण्यात आली. तसेच साईकृपा संस्थेच्या वतीने उपस्थित दिव्यांग बांधवांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. समाजात दिव्यांग बांधवांनी आत्मविश्वासाने आणि स्वाभिमानाने जीवन जगावे, असा संदेश मान्यवरांनी दिला.
यावेळी दिगवळे स्वामी समर्थ मठ ट्रस्टचे अध्यक्ष लुडबे सर, डॉ. मुंढे, प्रकाश वाघ, साईकृपा संस्थेचे उपाध्यक्ष शामसुंदर लोट, रमेश गावडे, सहसचिव सुनील तांबे, राजेंद्र मेस्त्री, सदस्य संदीप शिंगाडे, कृष्णा पांगम, विठ्ठल शिंगाडे, गीता परब, विशाखा कासले, ललित गावडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, साईकृपा संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांच्या पत्नी अनिता शिंगाडे यांचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला. त्यानंतर स्वामी समर्थ मठात आरती व प्रार्थना करण्यात आली. उपस्थित दिव्यांग बांधवांनी भजनरूपी सेवा सादर करून कार्यक्रमाचा आनंद घेतला. दिगवळे स्वामी समर्थ मठ ट्रस्टच्या वतीने सर्व दिव्यांग बांधवांना महाप्रसाद देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजेंद्र मेस्त्री आणि कृष्णा पांगम यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश वाघ यांनी केले. शेवटी साईकृपा संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.