कणकवली : कलमठ ग्रामपंचायतीने साकारलेला एकत्रित घरकुल संकुल प्रकल्प कौतुकास्पद-रुबल अगरवाल

शेअर करा

कलमठ येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील निवासी घरकुल संकुलाची आयुक्तांकडून पाहणी

कणकवली,दि.०४ सप्टेंबर

कलमठ ग्रामपंचायतीने साकारलेला एकत्रित घरकुल संकुल प्रकल्प कौतुकास्पद आहे. तो ग्रामविकासाला दिशादर्शक ठरणारा आहे. आपण एका विकसित आणि उपक्रमशील ग्रामपंचायतीला भेट दिल्याचा आनंद आहे. कलमठ येथे आलो नसतो तर एका उपक्रमशील ग्रामपंचायतीला भेट देण्याची संधी राहून गेली असती, असे मत कोकण विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांनी व्यक्त केले. ग्रामपंचायतीने राबविलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

कोकण विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांनी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यादरम्यान कलमठ ग्रामपंचायतीला भेट देत ग्रामपंचायतीच्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत साकारण्यात आलेल्या निवासी एकत्रित घरकुल संकुलाची पाहणी केली. यावेळी सरपंच संदीप मेस्त्री यांनी अगरवाल यांचे स्वागत करून ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या निवासी एकत्रित घरकुल संकुल प्रकल्पाची माहिती दिली.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गणेश महाडिक, सभापती हर्षदा वाळके, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर, दिनेश गोठणकर, अनुप वारंग, नितीन पवार, सचिन खोचरे, हेलन कांबळे, श्रेयस चिंदरकर, स्वाती नारकर, इफत शेख, नजराणा शेख, तेजस लोकरे, बाबू नारकर, तलाठी गोजीरी गोडे तसेच ग्रामपंचायत अधिकारी नावदेव तळवडेकर आदी उपस्थित होते.
कलमठ गावात विभागीय आयुक्तांची भेट होणे ही ग्रामस्थांसाठी अभिमानाची बाब आहे. ग्रामपंचायतीने घेतलेल्या मेहनतीचे हे फळ असून, या भेटीमुळे ग्रामपंचायतीच्या कामाला प्रोत्साहन मिळाले आहे, असे सरपंच संदीप मेस्त्री यांनी सांगितले.

शेअर करा