कृषी पदवीधर, अधिकारी व शेतकऱ्यांची महत्वपूर्ण बैठक; आधुनिक शेती, प्रक्रिया उद्योग व बाजारपेठेवर भर
कणकवली,दि.०९ ऑगस्ट
कळसुली गावातील शेतीचा विकास करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी पदवीधर, शासकीय अधिकारी, प्रगतिशील शेतकरी आणि ग्रामस्थ यांनी एकत्र येत पुढाकार घेतला आहे. गावातील शेती व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार कळसुली ग्रामपंचायत सभागृहात शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत करण्यात आला.
गावाच्या सर्वांगीण कृषी विकासाच्या दृष्टीने आयोजित या बैठकीत आधुनिक शेती तंत्रज्ञान, शासनाच्या विविध योजनांचा लाभ, सेंद्रिय शेती, शेतीपूरक व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, शेतमाल प्रक्रिया, बाजारपेठ तसेच पावसाचे पाणी अडविणे आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीचे प्रास्ताविक व उपस्थित शेतकऱ्यांचे स्वागत कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ विजय दिनकर दळवी यांनी केले. शेती विकासातील तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शासनाच्या योजनांचा लाभ घेत सकारात्मक दृष्टिकोनातून शेती केल्यास गावाच्या विकासाला मोठी चालना मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.
अधिष्ठाता उद्यानविद्या मुळदे येथील डॉ. विजय विष्णू दळवी यांनी कळसुलीशी असलेली आपली नाळ अधोरेखित करत गावाच्या विकासासाठी योगदान देण्याची भावना व्यक्त केली. कृषी पदवीधरांनी १० ते २० शेतकऱ्यांचे गट तयार करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात संधी असून, गावातच रोजगार व अर्थार्जनाच्या संधी निर्माण झाल्यास युवकांचे स्थलांतर थांबण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. गोवा बाजारपेठ जवळ असल्याने शेतमालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मोठी संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांनी विकसित केलेल्या भाताच्या जाती कळसुलीतील शेतकरी वापरत असल्याचे पाहून समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. नकारात्मक दृष्टिकोन बाजूला ठेवून सकारात्मक विचाराने शेतीकडे पाहण्याचे आवाहन त्यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र, किर्लोसचे शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी शेतकऱ्यांनी प्रथम आधुनिक शेतीचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. फळपिकांवर प्रक्रिया करणारे केंद्र सुरू करण्यात आले असून शेतकऱ्यांनी उत्पादित मालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन केल्यास अधिक नफा मिळू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. परसबागेतील कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, जीवामृत निर्मिती आदींचे प्रशिक्षण उपलब्ध असल्याने त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा मृद्संधारण अधिकारी श्रीमती मुळे यांनी जमिनीचे आरोग्य टिकविण्यासाठी माती परीक्षणाचे महत्त्व सांगितले. केवळ ३५ रुपयांत माती परीक्षणाची सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. जीवामृत, दशपर्णी अर्क यांचा वापर वाढवून रासायनिक खतांचा वापर कमी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
पंचायत समिती सदस्य प्रदीप गावडे यांनी संपूर्ण पंचक्रोशीचे प्रतिनिधी म्हणून कृषी विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. रासायनिक घटकांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याबरोबरच शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. साक्षी सावंत यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती देत पात्र शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. डॉ. एस. एस. दळवी यांनी गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या दूध संकलन केंद्रामुळे शेतकऱ्यांना होत असलेल्या लाभाची माहिती दिली. दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी प्रशिक्षण घेण्याचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश दळवी यांनी कळसुलीतील विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठे झाले असून आता ते गावाच्या विकासासाठी योगदान देत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांनी घाईगडबड न करता कृषी पदवीधरांचे मार्गदर्शन घ्यावे तसेच प्रगतिशील शेतकरी उत्तम वारंग यांच्यासारख्या शेतकऱ्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रवीण राऊत यांनी शेतकऱ्यांच्या कष्टाचे कौतुक करून आधुनिक कृषी अवजारांचा वापर आणि शासनाच्या अनुदान योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार

बैठकीत गावातील कृषी पदवीधर व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन १० ते २० जणांचे गट स्थापन करणे, पावसाचे पाणी अडविण्यासाठी उपाययोजना करणे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे, कुंपणाशिवाय शेतीचा प्रयोग करणे, सहकारी सोसायट्यांचे आधुनिकीकरण करणे, शेतकरी पुस्तकालय सुरू करणे, शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळविण्यासाठी प्रयत्न करणे, दुग्ध व्यवसायाचा विस्तार करणे आणि नवीन कृषी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेणे आदी निर्णय घेण्यात आले.
कृषी विकासाच्या माध्यमातून कळसुली गावाला समृद्ध व आत्मनिर्भर बनविण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला. शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठेची सांगड घातल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते, असा सूर बैठकीत उमटला.
बैठकीस विजय दिनकर दळवी, डॉ. विजय दळवी, कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण गावडे, जिल्हा मृद्संधारण अधिकारी श्रीमती मुळे, पंचायत समिती सदस्य प्रदीप गावडे, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश दळवी, सरपंच सचिन पारधिये, प्रवीण राऊत, डॉ. साक्षी सावंत, डॉ. एस. एस. दळवी, कृषी अधिकारी श्रीमती शेटे, श्रीमती निरवडेकर, श्री. जाधव, प्रगतिशील शेतकरी उत्तम वारंग, नि. स. वि. अधिकारी रामचंद्र जंगले, नि. पो. बापू खरात, श्री. सावंत, बाळा कदम यांच्यासह सुमारे ४० ते ४५ शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
