कणकवलीकरांनी सत्ता देऊन सहा महिने झाले पूर्ण : ६ महिन्यांमध्ये जनहिताचे निर्णय घेतले
कणकवली,दि. २१ जून
कणकवली नगरपंचायतीवर शहर विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ६ महिन्यांत जनहिताचे निर्णय घेतले. शहराच्या विकासासाठी केंद्र, राज्य शासनाच्या माध्यमातून निधी आणण्याचे कामे केले. यापुढील काळात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडे १०२ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीचे प्रस्ताव सादर केले आहेत. याशिवाय शहरातील विकासकामांचा गती देणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.
नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. पारकर बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक सत्यजित उर्फ बाळू पारकर, लुकेश कांबळे, दीपिका जाधव, जाई मुरकर आदी उपस्थित होते.
कणकवली नगरपंचायतीमध्ये सत्तांतर होऊन सहा महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संदेश पारकर यांनी गेल्या सहा महिन्यांतील कामांचा आढावा मांडला. शहरवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विकासकामांना प्राधान्य देत असल्याचे सांगितले. २१ डिसेंबर रोजी कणकवली नगरपंचायतीमध्ये सत्तांतर झाले. रविवार २१ जूनला सहा महिने पूर्ण होत आहेत. या कालावधीत जन हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. नगरपंचायतीचे ५८ कोटी रुपयांचे बजेट असून विविध शासकीय योजनांमधून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजना, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, आमदार निधी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, १५ वा वित्त आयोग आदी योजनांमधून शहर विकासासाठी निधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छतागृहासाठी निधी उपलब्ध झाला आहे.निम्मेवाडी-सुतारवाडी येथे नमो उद्यान विकसित करण्याचे काम सुरु करण्यात आल्याचे संदेश पारकर यांनी सांगितले.
कणकवलीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ४० घरांना मंजुरी देण्यात आली असून काही घरकुलांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. शहरातील विविध भागात हायमास्ट दिवे उभारण्याचे काम सुरू असून बांधकरवाडी, दत्त मंदिर परिसर, स्मशानभूमी परिसर, इतर महत्त्वाच्या ठिकाणी प्रकाश व्यवस्था करण्यात येणार आहे.
कणकवली शहरातील जलनिचरा व्यवस्था, भुयारी गटार योजना, नवीन गार्डन, आरक्षण क्रमांक २७ व २८ विकास प्रक्रिया, जलतरण तलाव प्रकल्प यावरही काम सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गाखालील उड्डाणपुलाखालील जागेचे सुशोभीकरण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे १ कोटी २० लाख रुपयांचे काम हाती घेतले जाणार आहे. शहराला लागून असलेल्या कलमठ गावात पाणीपुरवठा होत आहे. अग्निशमन केंद्रासाठी डीपीआर तयार झाला. शहर विकासासाठी राज्य शासनाकडे सुमारे १०२ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये काँक्रिट रस्ते, जलनिचरा, गार्डन, भुयारी गटार, व्यापारी संकुल, क्रीडांगण आदी कामांचा समावेश असल्याचे संदेश पारकर यांनी सांगितले.
आता कुत्रे निबीर्जीकरण मोहीम, स्टॉल हटाव मोहीम राबविण्यात आली.तसेच बगीचा सुशोभीकरण, ई-चार्जिंग सुविधा, कापडी पिशव्या निर्मिती मशीन, दर गुरुवारी गावठी आठवडा बाजार सुरू करण्याचे नियोजन आहे. सीएसआर फंडातून सिटीस्कॅन सुविधा, कार्डियाक रुग्णवाहिका सुरू करण्यासाठी प्रयत्न आहेत.शहराचा शाश्वत विकास करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे संदेश पारकर यांनी सांगितले.
सुशांत नाईक म्हणाले, नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली शहराला शिस्त लावण्याचा आणि विकासाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.