दहा-बारा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वैभववाडीत पावसाच्या सरी, शेतकऱ्यांना दिलासा
वैभववाडी ,दि. २१ जून
दहा-बारा दिवसांच्या खंडानंतर रविवारी सायंकाळी वैभववाडी तालुक्यात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह झालेल्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींमुळे करपू लागलेल्या भात रोपांना नवसंजीवनी मिळाली असून चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर या पावसामुळे समाधान दिसून आले.
यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेळेत भात पेरणीची कामे पूर्ण केली होती. मृग नक्षत्राच्या प्रारंभी चांगला पाऊस होईल, या अपेक्षेने अनेकांनी मोठ्या प्रमाणात पेरण्या केल्या. मात्र त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली होती. मृग नक्षत्र सुरू होऊन तब्बल पंधरा दिवस उलटून गेले तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने भाताची रोपे करपू लागली होती. अनेक ठिकाणी रोपांचा हिरवा रंग फिका पडून ती पिवळी दिसू लागली होती.
पावसाअभावी शेतजमिनींमध्ये ओलावा कमी झाल्याने भात रोपांच्या वाढीवर परिणाम होऊ लागला होता. काही शेतकऱ्यांनी विहिरी, ओढे किंवा उपलब्ध जलस्रोतांमधून पाणी आणून भाताच्या तरव्यांना शिंपण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्वच शेतकऱ्यांना ही सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकांच्या रोपांवर संकटाचे ढग दाटून आले होते. पाऊस आणखी काही दिवस लांबला असता तर मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
रविवारी सकाळपासूनच तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पावसाची चिन्हे दिसू लागली होती. सायंकाळी अचानक आकाशात ढग दाटून आले आणि गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळू लागल्या. तालुक्यातील अनेक भागांत पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतजमिनींना आवश्यक ओलावा मिळाला आहे. या पावसामुळे भात रोपांना पुन्हा जीवदान मिळाले असून आगामी काही दिवस नियमित पाऊस झाल्यास भात लागवडीची कामेही वेग घेणार आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णता आणि दमट हवामानामुळे नागरिकही त्रस्त झाले होते. रविवारी झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. आता पुढील काही दिवस मान्सून सक्रिय राहून समाधानकारक पाऊस पडावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.