कणकवली : माजी आमदार केशवराव राणे यांना कणकवली महाविद्यालयात अभिवादन

शेअर करा


कणकवली,दि. २१ जून

येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात माजी आमदार तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक चेअरमन, शिक्षणमहर्षी कै. केशवराव राणे यांच्या १६ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व कृषी क्षेत्रातील योगदानाचा गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला.
माजी आमदार केशवराव राणे यांचे २० जानेवारी २०१० रोजी निधन झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कणकवली महाविद्यालयात दरवर्षी अभिवादन कार्यक्रमासह प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. त्याच परंपरेनुसार यावर्षी प्रभारी तालुका कृषी अधिकारी श्री. अर्जुन जाधव यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्री. अर्जुन जाधव यांनी कोकणातील फलोद्यान लागवडीचे महत्त्व विशद केले. कोकणातील हवामान, भौगोलिक परिस्थिती आणि बाजारपेठेतील वाढती मागणी लक्षात घेता आंबा, काजू, नारळ, सुपारी यांसारख्या फलपिकांच्या लागवडीस मोठी संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. लघु व अल्पभूधारक शेतकऱ्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन फलोद्यान विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त डॉ. सौ. राजश्री साळुंखे उपस्थित होत्या. मंचावर शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्री. अनिल डेगवेकर, ज्येष्ठ सदस्या डॉ. सविता तायशेटे, श्री. सतीश नाईक, श्री. सदानंद हर्णे, प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, ग्रामीण विकास विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र मुंबरकर, पर्यवेक्षक महादेव माने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी माजी आमदार केशवराव राणे यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी, शिक्षण, जलसिंचन, फळउत्पादन, परिवहन सेवा, रोजगारनिर्मिती तसेच एस.टी. महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय व अविस्मरणीय कार्याची माहिती त्यांनी दिली. केशवराव राणे हे खऱ्या अर्थाने लोकनेते होते. राजकारणातील आदर्श नेतृत्वाचे ते उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. राजश्री साळुंखे यांनी कै. केशवराव राणे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील शिस्त, त्याग, परिश्रम, कामातील सचोटी आणि शिक्षणाविषयीची तळमळ या गुणांचा आदर्श समाजाने स्वीकारला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ. सोमनाथ कदम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. वैशाली पाटील यांनी केले, तर आभार आजीवन अध्ययन व विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ. सुरेश हुसेन यांनी मानले.
या कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा