Kankavli Crime :तीन वर्षांपासून फरार आरोपीला मुंबईतून अटक

शेअर करा

सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; कणकवलीतील चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा

कणकवली,दि.०७ ऑक्टोंबर

कणकवली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना हवा असलेला आरोपी अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या हाती लागला. संशयित आरोपी लीलाधर मोडाराम सुथार (वय 39, मूळ रा. पिंपासार, नागोर, राजस्थान) याला मुंबईतील ताडदेव परिसरातून 6 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेत अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

कणकवली पोलीस ठाण्यात 15 जून 2023 रोजी गुन्हा भादंवि कलम 381 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी सतीश विजय नाईक (वय 50, रा. नाथ पै नगर, कणकवली) यांच्या घरी सुमारे वर्षभर काम करणाऱ्या लीलाधर सुथार याने त्यांच्या पत्नीचे 3.7 तोळे सोन्याचे दागिने, तसेच सुमारे 1 लाख रुपये किमतीचे लाकडी प्लायवूड चोरी करून पलायन केले होते. गुन्हा केल्यानंतर आरोपीने गोवा, राजस्थानमधील जयपूर, उदयपूर आदी विविध ठिकाणी वास्तव्य करत सुमारे तीन वर्षे आपले अस्तित्व लपविले होते. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तो मुंबईतील ताडदेव परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती.

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आराध्या आवान बिल्डिंगजवळ, भाटिया हॉस्पिटलच्या मागे, ताडदेव, मुंबई येथे सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला पुढील कार्यवाहीसाठी कणकवली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुरेश राठोड, पोलीस जॅकसन घोन्साल्विस, अमर कांडर , कणकवली पोलीस ठाण्याचे हवालदार पांडुरंग पांढरे यांच्या पथकाने केली. या कारवाईबद्दल सिंधुदुर्ग पोलीसांचे कौतुक होत आहे.

शेअर करा