कणकवली : कणकवली तालुक्यातील महा ई सेवा क्रेंद्रांमध्ये होणार प्रतिज्ञापत्र

शेअर करा

तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांच्या मंडल अधिका-यांना सुचना ; तहसिलदार कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी निर्णय

कणकवली, दि. २७ मे
कणकवली तहसिलदार कार्यालयात सध्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रवेश प्रकिया सुरु असल्यामुळे विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी धावपळ सुरु आहे. त्यामुळे तहसिलदार कार्यालयातील सेतु सुविधा केंद्रांमध्ये प्रतिज्ञापत्रासाठी गर्दी होत आहे. तेच प्रतिज्ञापत्र तालुक्यातील महसुल मंडल स्तरावर महा ई सेवा केंद्रांवर करण्याच्या सुचना तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी मंडल अधिका-यांना दिल्या आहेत. तसेच नागरिकांनी आपले विविध दाखले काढण्यासाठी प्रतिज्ञापत्र महा ई सेवा केंद्रांमधून करुन ती तेथील मंडल अधिकारी यांच्यासमोर सत्यशपथ घ्यावी , असे आवाहन दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे.
कणकवली सेतु सुविधा केंद्रात होणारी गर्दी लक्षात घेवून बुधवारी स्वत: तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी आढावा घेतला. यावेळी महाआयटी विभागाकडून सिस्टीममध्ये केलेल्या बदलामुळे विलंब लागत असल्याचे दिसून आले.
दरम्यान ,आगामी काळात विद्यार्थ्यांसह पालकांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने कणकवली तालुक्यातील मंडल अधिका-यांची बैठक तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत फोंडा , नांदगाव , तळेरे , सांगवे ,खारेपाटन , वागदे या ठिकाणच्या मंडल अधिकारी कार्यालयात प्रतिज्ञापत्राची सत्यशपथ घेवून नागरिकांना प्रतिज्ञापत्राची सोय करुन दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सेतु सुविधा कार्यालयात येवून विनाकारण गर्दी करु नये.जेणेकरुन आपली कामे प्रशासनामार्फत वेळेत होतील , त्या दृष्टीने महा ई सेवा केंद्र चालक फोंडाघाट मंडळ – गणेश तेली 9420154648 , नरडवे – लक्ष्मण ढवळ 9405331719 , सांगवे – श्री. कुलकर्णी 9421975145 , खारेपाटण – भूषण कांबळे 9209637292 , नांदगाव – लोके 9730308057 , तळेरे – शैलेश सुर्वे 9271573400 , कणकवली – तन्वी भावे 9405881739 , कणकवली – सुहास बिड्ये यांच्याकडे प्रतिज्ञापत्र करावे , असे आवाहन तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे.

महाआयटीक़़डून आधारकार्ड व स्वाक्षरी स्कॅनिंग सुरु केल्यामुळे विलंब –

महाआयटीकडून स्कॅनिंग , जीपीआर सिस्टिम कार्यान्विक करण्यात आली आहे. त्यामुळे प्रतिज्ञापत्र करताना नागरिकांचे महाआयटीवर आधारकार्ड , स्वाक्षरी स्कॅनिंग केले जात आहे. ही प्रक्रिया सोमवारपासून सुरु करण्यात आल्याने एका प्रतिज्ञापत्राला किमान 10 मिनिटे लागत आहेत. कणकवली तहसिलदार कार्यालयातील सेतू कार्यालयामध्ये दररोज 100 ते 125 प्रतिज्ञापत्र होत आहेत. त्यातच महाआयटीचा सर्व्हर नेहमी अधूनमधून धिम्या गतीने चालतो.त्यामुळे सेतु केंद्राबाहेर गर्दी होते. सोमवारापासून नव्याने सुरु करण्यात आलेली स्कॅनिंग सिस्टीम बंद करावी , असे महाआयटी विभागाला कळवले असल्याचे तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी सांगितले.

शेअर करा