कणकवली महाविद्यालयात इतिहास व अर्थशास्त्र विषयांसाठी पीएच.डी. संशोधन केंद्रास मान्यता

शेअर करा

कणकवली,दि.३१ जुलै

येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात इतिहास आणि अर्थशास्त्र या दोन विषयांसाठी मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून पीएच.डी. संशोधन केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र महाविद्यालयास प्राप्त झाले असून, लवकरच पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

कणकवली महाविद्यालयात सन १९९२ पासून पदव्युत्तर शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये इतिहास व अर्थशास्त्र या विषयांसाठी मुंबई विद्यापीठाचे पीएच.डी. संशोधन केंद्र उपलब्ध नसल्याने या भागातील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मुंबई किंवा अन्य शहरांमध्ये जावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन कणकवली महाविद्यालयाने इतिहास आणि अर्थशास्त्र या विषयांसाठी पीएच.डी. संशोधन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मुंबई विद्यापीठाकडे सादर केला होता.

महाविद्यालयाच्या प्रस्तावाची दखल घेत मुंबई विद्यापीठाच्या स्थानिक चौकशी समितीने महाविद्यालयाची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल विद्यापीठाकडे सादर केला. त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद आणि संबंधित अधिष्ठाता समितीच्या अंतिम शिफारशीनंतर कणकवली महाविद्यालयास इतिहास आणि अर्थशास्त्र या दोन विषयांमध्ये पीएच.डी. संशोधन केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

दक्षिण कोकणातील इतिहास आणि अर्थशास्त्र या दोन विषयांसाठी पीएच.डी. संशोधन केंद्रास मान्यता मिळाल्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच कोकणातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या पुढील टप्प्यात संशोधनाची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध होणार आहे. विशेषतः कोकणच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि स्थानिक विकासाशी संबंधित विविध विषयांवर संशोधन करण्यास यामुळे मोठ्या प्रमाणात वाव मिळणार आहे. स्थानिक इतिहास, कोकणचा आर्थिक विकास, ग्रामीण अर्थव्यवस्था, पर्यटन, स्थलांतर, सामाजिक परिवर्तन तसेच विविध समकालीन प्रश्नांवर दर्जेदार संशोधनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून कणकवली येथे केजी ते पीजीपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता पीएच.डी. संशोधन केंद्राच्या मान्यतेमुळे उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रातील महत्त्वाची उणीवही भरून निघणार आहे. कोकणातील विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातच संशोधनाची संधी उपलब्ध करून देत शिक्षण प्रसारक मंडळाने ग्रामीण भागातील उच्च शिक्षणाच्या विकासात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे याबद्दल प्रा.डॉ.राजश्री साळुंखे,शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन डॉ. अनंत नागवेकर ,सचिव श्री विजयकुमार वळंजू व सर्व संस्था पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
मुंबई विद्यापीठाने इतिहास विषयासाठी कणकवली महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख तथा मुंबई विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. सोमनाथ कदम आणि डॉ. प्रमोद मेश्राम, तर अर्थशास्त्र विषयासाठी डॉ. बालाजी सुरवसे आणि डॉ. रामा सरतापे यांना पीएच.डी. संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली आहे.
पीएच.डी. प्रवेशासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर कणकवली महाविद्यालयातील पीएच.डी. संशोधन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे यांनी केले आहे.

शेअर करा