जिल्ह्यात ‘गो-सेवा’ करावी;समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन
कणकवली,दि. २१ जून
कोकणातील आंबा व काजू पिकांचे अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, लांबलेल्या पावसामुळे मच्छीमार बांधवांसमोरील निर्माण झालेली अडचण तसेच राज्यभर एल-निनोच्या सावटामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई आणि दुष्काळाचे संकट लक्षात घेऊन यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचे राज्याचे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जाहीर केले आहे.
यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर संदेश देत सांगितले की, आनंदोत्सवापेक्षा सध्या उभ्या ठाकलेल्या परिस्थितीचे भान ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे.
तसेच त्यांनी हितचिंतक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटण्याऐवजी आपल्या जिल्ह्यात ‘गो-सेवा’ करावी व विविध समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले आहे.
हिंदू संस्कारातून गोमातेची सेवा, गोसंवर्धनाच्या कार्यात सहभाग तसेच गरजूंची मदत आणि समाजहिताचे कार्य हेच खऱ्या अर्थाने उत्सवाचे स्वरूप असल्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे. “तुमचा हा सेवाभाव हीच माझ्यासाठी लाखमोलाची सदिच्छा असेल,” असा संदेशही त्यांनी दिला आहे