​​कणकवली : अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडा- वैभव नाईक

शेअर करा

देवगड येथील अणुऊर्जा प्रकल्पाला आंबा-काजू शेतकऱ्यांचा ताकदीने विरोध

 ​​कणकवली,दि.०३ जुलै
आंबा काजू बागायतदार, देवगड व्यापारी संघ आणि अणुऊर्जा प्रकल्प विरोधी संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आणि आंबा बागायतदारांच्या न्याय मागण्यासाठी भव्य मेळावा व जलसमाधी आंदोलन देवगड तालुक्यातील मिठमुंबरी येथे आयोजित करण्यात आले.माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार विनायक राऊत, माजी मंत्री महादेव जानकर, माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची या आंदोलनाला प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आंबा काजू शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंतु जलसमाधी आंदोलन करण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याने उपस्थित नेत्यांनी सरकार आणि पालकमंत्र्यांवर प्रखर शब्दात टीका केली.


यावेळी माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यावरणवादी जिल्हा आहे. पर्यावरण विरोधी प्रकल्पाला कायम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने विरोध केला आहे. अणुऊर्जा प्रकल्पाला देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचा विरोध आहे. आंबा काजू पिकांचे या प्रकल्पामुळे मोठे नुकसान होणार आहे. पर्यावरणाचा देखील त्रास होणार आहे. आंबा काजू बागायतदारांच्या पाठिंब्यामुळे पालकमंत्री नितेश राणेंनी या मतदारसंघातील अनेक निवडणुका जिंकल्या. मात्र आंबा काजू बागायतदारांनी नुकसान भरपाई 

मागण्यासाठी पहिले आंदोलन केले तेव्हा पालकमंत्री नितेश राणे यांनी त्या ठिकाणी येऊन हेक्टरी तीन लाखापेक्षा जास्त मदत आम्ही मुख्यमंत्र्यांकडून जाहीर करू असे आश्वासन दिले होते. परंतु कालच्या अधिवेशनातही ती मदत ते जाहीर करू शकले नाहीत. २०० रु.ची तुटपुंजी मदत जाहीर करून आंबा काजू शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केले. पालकमंत्र्यांचे भाऊ आमदार निलेश राणे यांनी तर त्या तुटपुंज्या मदतीचे बॅनर लावले परंतु ती तुटपुंजी मदत शेतकऱ्यांनी कधीच नाकारली आहे. आज येथील स्थानिक जिल्हा परिषद सदस्य आले नसले तरी आमचे जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे हे तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. 


अणुऊर्जा प्रकल्प रद्द करण्यासाठी ते जिल्हा परिषद बैठकीत ठराव मांडतील. पालकमंत्री आजगाव आणि देवगड मध्ये आले तेव्हा त्यांनी प्रस्तावित असलेले  प्रकल्प होणार नाहीत हा माझा शब्द असल्याचे सांगितले.परंतु वैभव नाईक यांनी पालकमंत्री यांना आव्हान देताना तुम्ही दिलेला शब्द कागदावर लिहून आणून दाखवा असे जाहीरपणे सांगितले. मागची दहा वर्षे आम्ही सत्तेत होतो तेव्हा असे अनेक प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊ पाहत होते. परंतु आम्ही त्यांना थारा दिला नाही. त्यावेळी या प्रकल्पांना आम्ही हाणून पाडले. आता देखील अणुऊर्जा प्रकल्पाला हद्दपार करण्यासाठी आपल्याला लढावं लागेल. सिंधुदुर्ग जिल्हा उद्योगपतींच्या घशात घालण्याचा सत्ताधारी प्रयत्न करत आहेत. आंदोलन दडपण्यासाठी पोलीस फोर्स लावण्यात आला आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत हा लढा सुरूच ठेऊन सत्ताधाऱ्यांचा अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न हाणून पाडा. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे अशी ग्वाही माजी आमदार, शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी दिली.

शेअर करा