कणकवली : निवडणूक जातपडताळणी अर्जासोबत जमा केलेली फी परत मिळावी

शेअर करा

सिंधुदुर्ग जात पडताळणी समितीकडे माजी आमदार परशुराम उपरकर यांची मागणी ; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमधील उमेदवारांचे पैसे परत करा

कणकवली,दि.२८ जुलै

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत व नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये उमेदवारांकडून जात पडताळणीसाठी दाखल उमेदवारी अर्जासोबत ५०० रुपयांची फी जमा करण्यात आली होती. त्यामधील काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले किंवा पक्षाकडून उमेदवारी मिळालेली नाही , अशी रक्कम त्या उमेदवारांना परत देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जातपडताळणी समितीकडे निवेदन सादर केले आहे.

निवेदनात उपरकर यांनी म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांकडून ५०० रुपयांची फी घेण्यात आली होती. निवडणुकीनंतर अनेक उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्याने किंवा इतर कारणांमुळे त्यांची उमेदवारी रद्द झाली. तसेच काही उमेदवारांना पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अर्ज मागे घेतले. अशा परिस्थितीत संबंधित उमेदवारांची सदर रक्कम शासनाकडेच जमा राहिली असून, ती उमेदवारांना परत मिळालेली नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा सर्व पात्र उमेदवारांची यादी तयार करून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा आणि त्यांना त्यांच्या रकमेची परतफेड करावी. या मागणीमुळे अनेक उमेदवारांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेअर करा