१२ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
कणकवली,दि.०१ जुलै
आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याचे शिक्षण अर्धवट राहू नये, या उद्देशाने गेल्या २० वर्षांपासून कार्यरत असलेल्या दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी (शासकीय महाविद्यालय), आर्किटेक्चर, कृषी, फार्मसी, नर्सिंग तसेच दहावीनंतर डिप्लोमा शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
बारावीत किमान ८० टक्के गुण मिळवूनही आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेण्यास अडचण येणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच दहावीनंतर महाराष्ट्रातील कोणत्याही महाविद्यालयात डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे गरजू विद्यार्थीही अर्ज करू शकतात. उपलब्ध निधीनुसार महाविद्यालयाची फी, राहण्याचा व जेवणाचा खर्च यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.
शेतमजूर, अल्पभूधारक, अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांतील तसेच पालक नसलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया १ जुलै ते १२ जुलै २०२६ या कालावधीत सुरू राहणार असून ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर मिळणारा अर्ज क्रमांक ऑफलाइन अर्जावर नमूद करणे आवश्यक आहे.
अर्जासोबत दहावी-बारावीची गुणपत्रिका, प्रवेश पावती, फी स्ट्रक्चर, आधार कार्ड, रेशन कार्ड, वीज बिल, उत्पन्नाचा दाखला, शेतकरी असल्यास ७/१२ व ८-अ उतारा, वसतिगृहाचे प्रमाणपत्र (लागू असल्यास) तसेच इतर आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी भरलेला ऑफलाइन अर्ज व सर्व कागदपत्रे स्पीड पोस्टाने दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्ट, द्वारा अनंत रानडे, रानडे ब्रदर्स, २२ बाजारपेठ, राजापूर, जि. रत्नागिरी – ४१६७०२ या पत्त्यावर पाठवावीत.
ऑनलाइन अर्ज व अधिक माहितीसाठी https://dishapariwar.org.in/scholarship या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी गजानन जोशी – ९४०५९५५६३६ किंवा ९८६००२१०८२ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.