कणकवली : नांदगाव येथे ९ ऑगस्ट रोजी भव्य ‘भारुड महोत्सव – २०२६’ चे आयोजन

शेअर करा

कणकवली,दि.०२ ऑगस्ट

कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था, कणकवली यांच्या वतीने कोकणातील लोकप्रबोधन, समाजप्रबोधन आणि अध्यात्माचा प्रभावी लोककलाप्रकार असलेल्या भारुड कलेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने ‘भारुड महोत्सव – २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत नांदगाव तिठा, नांदगाव येथे होणार आहे.

भारुड ही संतपरंपरेतून समाजाला नैतिकता, संस्कार, भक्ती, कर्तव्य आणि जीवनमूल्यांचा संदेश देणारी प्रभावी लोककला आहे. रामायण, महाभारत, गरुडपुराण, विष्णुपुराण, शिवपुराण तसेच विविध पुराणग्रंथ आणि ऐतिहासिक कथांतील प्रसंग भारुडाच्या माध्यमातून प्रभावी व रंजक शैलीत जनसामान्यांपर्यंत पोहोचविले जातात. बदलत्या काळात लोप पावत चाललेल्या या समृद्ध लोककलेचे संवर्धन व्हावे, नव्या पिढीला या सांस्कृतिक वारशाची ओळख व्हावी तसेच भजनी बुवांचा भारुडाकडे पुन्हा कल वाढावा, या उदात्त हेतूने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात कणकवली तालुक्यातील निमंत्रित दहा नामवंत भजनी बुवा आपल्या भारुड गायनाची कला सादर करणार असून उपस्थितांना आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.

या सांस्कृतिक व आध्यात्मिक महोत्सवाला भजनप्रेमी, भारुड रसिक, वारकरी संप्रदायातील भाविक तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन तालुकाध्यक्ष प्रकाश सखाराम पारकर, सचिव निलेश लक्ष्मण ठाकूर, समस्त पदाधिकारी व कार्यकारिणी, कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था तसेच ग्रामपंचायत नांदगावचे सरपंच रविराज (भाई) मोरजकर यांनी केले आहे.

शेअर करा