कणकवली नगरपंचायतीच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियान उत्साहात..

शेअर करा

तिरंगा रॅली, ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन, रांगोळी व पोस्टर्स स्पर्धेसह विविध उपक्रम

कणकवली,दि.१४ ऑगस्ट

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात दि. 09 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत कणकवली नगरपंचायतीच्या वतीने विविध देशभक्तीपर उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
शुक्रवारी सकाळी 10 वाजता कणकवली नगरपंचायत कार्यालयापासून तिरंगा मोटरसायकल व सायकल रॅलीला सुरुवात झाली. पटकीदेवी मंदिर, बाजारपेठ, पटवर्धन चौक, नरडवे रोड मार्गे रेल्वे स्टेशन असा प्रवास करत रॅलीची सांगता विद्यामंदिर पटांगण येथे करण्यात आली. या रॅलीमध्ये अंदाजे 40 ते 50 मोटरसायकल व सायकलस्वारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
रॅलीनंतर ‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कणकवली कॉलेज, विद्यामंदिर हायस्कूल व एस. एम. हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक तसेच नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन करण्यात आले. राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणाऱ्या या सामूहिक गायनाने संपूर्ण परिसर भारावून गेला.
यानंतर तिरंगा रांगोळी व पोस्टर्स स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. तसेच शाळा क्रमांक 5 येथील विद्यार्थ्यांकडून ‘वीरांचा सन्मान’ या विषयावर पत्रलेखनाचा उपक्रम राबविण्यात आला.
14 ऑगस्ट हा फाळणी भयावहता स्मृती दिन म्हणूनही पाळण्यात आला. फाळणीच्या काळातील दुःख, विस्थापन, संघर्ष, त्याग व मानवी वेदनांचे स्मरण म्हणून फाळणीवरील लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून फाळणीतील पीडितांना श्रद्धांजली अर्पण केली.
या कार्यक्रमास कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, मुख्याधिकारी गौरी पाटील, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक सत्यजित पारकर, कणकवली कॉलेजचे प्राचार्य युवराज महालींगे, विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. जी. कांबळे तसेच नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी, कणकवली कॉलेज, विद्यामंदिर हायस्कूल व एस. एम. हायस्कूलचे प्राध्यापक, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशभक्तीची भावना जागृत करणाऱ्या या उपक्रमांमुळे कणकवली शहरात ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शेअर करा