Sawantwadi News : रोणापालमध्ये ‘ओंकार’ हत्तीचा धुमाकूळ; थेट घराच्या ओसरीवर घातला मुक्काम!

शेअर करा

बाळासाहेब परुळेकर यांच्या फार्म हाऊसमध्ये हत्तीचा प्रवेश; केळी व खाद्यपदार्थ फस्त, जीप-कार आणि गवताच्या गंजीला घासून नुकसान करण्याचा प्रयत्न; कुटुंबात भीतीचे वातावरण


​सावंतवाडी,दि. ०१ नोव्हेंबर


तालुक्यातील रोणापाल येथील रहिवासी बाळासाहेब परुळेकर यांच्या बागेत काल शनिवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास ‘ओंकार’ नावाच्या हत्तीने अचानक प्रवेश केला. हत्ती थेट घराच्या ओसरीपर्यंत पोहोचल्याने परुळेकर कुटुंबात प्रचंड घबराट पसरली होती.
​मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेब परुळेकर यांच्या फार्म हाऊसच्या ओसरीवर ठेवलेली केळी आणि इतर खाद्यपदार्थ ओंकार हत्तीने मटकावले. त्यानंतर हत्तीने आवारात उभ्या असलेल्या महिंद्रा जीप आणि कारला स्वतःचे शरीर घासून वाहनांचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. तसेच जवळच असलेल्या गवताच्या गंजीलाही अंगाने घासून ती ढकलून देण्याचा प्रयत्न केला.
​हत्ती आवारात आला तेव्हा सुरुवातीला वनविभागाचे कर्मचारी तेथे उपस्थित नव्हते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून परुळेकर यांनी तात्काळ सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
​परुळेकर कुटुंबाने व्यक्त केली भीती:
“ओंकार हत्ती सुरुवातीला घरी आला तेव्हा आनंद वाटला आणि मुख्य दरवाजासमोर उभा असताना साक्षात गणपतीचे दर्शन झाल्यासारखे समाधान मिळाले. मात्र, त्याने जेव्हा वाहने ढकलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भीती वाटली. आमचे घर आंबा बागायतीमध्ये असून आजूबाजूला दुसरे कोणतेही घर नाही, त्यामुळे आम्ही कुटुंबिय पूर्णपणे घाबरून गेलो होतो,” अशी प्रतिक्रिया बाळासाहेब परुळेकर यांनी दिली.
​परिसरात हत्तीचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.

शेअर करा