Kankavli News : ओसरगाव येथे ५७ लाखांची ॲल्युमिनियम केबल चोरी,तिघांना अटक

शेअर करा

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरी; चोरीचा मुद्देमाल वाहनांसह हस्तगत

कणकवली ,दि.०५ नोव्हेंबर

तालुक्यातील ओसरगाव-गवळवाडी येथे तब्बल ५७ लाख ४० हजार ९९५ रुपये किमतीच्या ॲल्युमिनियम लाईट केबलची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तत्परतेने तपास करत राजस्थान आणि हरियाणा राज्यातील तीन संशयित आरोपींना चोरीच्या मुद्देमालासह वाहनांसह ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे मोठी चोरी उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

ओसरगाव, गवळवाडी येथे ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० ते ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० या कालावधीत ॲल्युमिनियम लाईट केबलची पॅकिंगसह असलेली एकूण पाच बंडले चोरीला गेली होती. याबाबत ५ नोव्हेंबर रोजी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने समांतर तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके तयार करण्यात आली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती, मानवी कौशल्य आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला.

या तपासात इरशाद खुर्शीद खान (वय ३२, रा. हमिर्राका, ता. तिजारा, जि. अलवर, राजस्थान), आरिफ खुर्शीद खान (वय ३०, रा. निमखेडा, बडेड, मेवात, हरियाणा) आणि शाहीद खुर्शीद खान (वय २४, रा. निमखेडा, बडेड, मेवात, हरियाणा) या तिघांना ५ नोव्हेंबर रोजी चोरीस गेलेल्या मुद्देमालासह आणि त्यांच्या ताब्यातील वाहनांसह ताब्यात घेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना पुढील तपासासाठी कणकवली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस फौजदार सुरेश राठोड, राजेंद्र जामसंडेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण देसाई, राजेंद्र गोसावी, आशिष जामदार आणि पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर यांचा समावेश होता.

शेअर करा