भाजप-शिंदेसेना नगरसेवक आमनेसामने; प्रकरणाच्या सखोल चौकशीचे नगराध्यक्षांचे आश्वासन!
सावंतवाडी, ५ नोव्हेंबर
सावंतवाडी नगरपरिषदेच्या गुरुवारी झालेल्या मासिक बैठकीत पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांच्या राजीनाम्यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी शिवसेना (शिंदे गट) नगरसेवकांमध्ये तीव्र खडाजंगी उडाली. भाजप पक्षाची बदनामी टाळण्यासाठी हा राजीनामा घेतल्याचे स्पष्टीकरण नगराध्यक्षांनी दिले, तर दुसरीकडे विरोधकांनी या प्रकरणाच्या चौकशीची जोरदार मागणी केली. अखेर, प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणले जाईल, असे आश्वासन नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी दिले.
नगराध्यक्ष सौ. श्रद्धाराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत व्यासपीठावर उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्थित होते.
मागील सभेत पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आजच्या सभेत तो राजीनामा मंजूर करून नवीन सभापती नियुक्तीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याच्या विषयावर चर्चा सुरू असताना वादाला तोंड फुटले.
यावेळी नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी स्पष्ट केले की, “पाणीपुरवठा विभागातील कोणतीही बिले मंजूर झालेली नाहीत, त्यामुळे प्रतीक बांदेकर पूर्णपणे निर्दोष आहेत. याची कल्पना पाणीपुरवठा समितीच्या सदस्यांनाही आहे.”
नगराध्यक्षांच्या या वक्तल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) सदस्या शर्वरी धारगळकर यांनी ती बिले मंजूरच झाली नसल्याचे सांगितले. त्यावर सत्ताधारी भाजपचे नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांनी आक्रमक होत, “जर बिले मंजूरच झाली नाहीत आणि बांदेकर निर्दोष आहेत, तर मग तुम्ही त्यांचा राजीनामा का मागितला? पत्रकार परिषदा घेऊन त्यांची नाहक बदनामी का केली?” असा सवाल उपस्थित करत शिंदे सेनेच्या नगरसेवकांना धारेवर धरले.
याला प्रत्युत्तर देताना शिंदे सेनेचे गटनेते खेमराज कुडतरकर म्हणाले, “आम्ही राजीनाम्याची मागणी केली हे सत्य आहे, पण जर ते निर्दोष होते, तर मग तुमच्याच पक्षाने त्यांचा राजीनामा का घेतला?”
यावर स्पष्टीकरण देताना नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी सांगितले की, “पक्ष आणि पदाची बदनामी होऊ नये म्हणून वरिष्ठांच्या आदेशानुसार हा राजीनामा घेण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, त्यानंतरच सत्य बाहेर येईल.”
मुख्याधिकाऱ्यांवर आरोप आणि चौकशीचे आश्वासन:
चर्चेदरम्यान काँग्रेसचे नगरसेवक तौकीर शेख यांनी, सभापती प्रतीक बांदेकर निर्दोष असून या सर्व प्रकरणाला मुख्याधिकारी जबाबदार असल्याचा आरोप केला. तसेच आपल्याकडे याबाबत पुरावे असून चौकशी लावल्यास सर्व स्पष्ट होईल, असे आव्हान त्यांनी दिले. दुसरीकडे, मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचे स्पष्ट करत आपण चौकशीला पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले.
या चर्चेत भाजपच्यावतीने सुनीता पेडणेकर, सुधीर आरीवडेकर,निलम नाईक,दुलारी रांगणेकर, सिद्धार्थ भांबुरे, तर शिंदे सेनेच्यावतीने ॲड. निता कविटकर, देव्या सूर्याजी , ठाकरे शिवसेना देवेंद्र टेमकर यांनी सहभाग घेतला. बैठकीच्या शेवटी नगराध्यक्षांनी या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून दूध का दूध आणि पाणी का पाणी केले जाईल, असे आश्वासन दिले.




