​Sawantwadi News : सावंतवाडी नगरपरिषद सभा: भाजी मंडईच्या ३८ लाखांच्या अतिरीक्त खर्चावरून खडाजंगी

शेअर करा

शहरात उघड्यावर मच्छी विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश

​सावंतवाडी,दि.०५ नोव्हेंबर
सावंतवाडी नगरपरिषदेची मासिक सभा नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या पहिल्या टप्प्यातील वॉटरप्रूफिंग व डिवाटरिंगच्या ३८ लाख ८५ हजार रुपयांच्या अतिरीक्त खर्चावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा झाली. हा खर्च नगरपालिकेच्या फंडातून न देता शासनाकडून वसूल करण्यात यावा, असा पवित्रा नगरसेवकांनी घेतला. तसेच शहरातील विविध विकासकामे, बिलो दरात दिली जाणारी कामे, मच्छी मार्केटचा प्रश्न आणि भटक्या कुत्र्यांच्या वादावर या सभेत सविस्तर चर्चा होऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या नवीन इमारतीमधील वाहनतळ भागात वॉटरप्रूफिंग व इतर कामांसाठी ३८ लाख ८५ हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च झाला असून, तो नगरपालिकेच्या फंडातून मिळावा, अशी मागणी विकासकाकडून करण्यात आली होती. यावर सत्ताधारी गटाचे सुधीर आडिवरेकर यांनी तीव्र विरोध दर्शवत, “संबंधित विकासकाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून किंवा शासनाकडून हा खर्च वसूल करावा, पालिकेच्या फंडातून एकही रुपया दिला जाऊ नये,” अशी ठाम भूमिका मांडली. या प्रकरणी कामाची योग्य तपासणी करून अतिरिक्त खर्चाचा भार हलका करण्यासाठी शासनाला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश नगराध्यक्षांनी दिले. दरम्यान, मोती तलावाची पार्श्‍वभूमी लक्षात घेऊनच अशा प्रकल्पांचे आराखडे तयार करायला हवे होते, अशी सूचना नगरसेवक सिद्धार्थ भांबुरे यांनी केली; तसेच या संपूर्ण प्रकाराला संबंधित आर्किटेक्ट जबाबदार असून त्यांना यापुढे पालिकेच्या पॅनलवर घेऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली.
​’बिलो दरात’ काम देण्याच्या प्रथेवर नगरसेवकांचा आक्षेप:
सर्वोदय नगरातील खुली जागा विकसित करण्याच्या कामाला मुदतवाढ देण्याचा विषय सभेत आला. पालिकेची जागा असताना नागरिकांनी झाडे लावल्यामुळे ठेकेदाराला वेळेत काम पूर्ण करता आले नाही, त्यामुळे त्याच्यावर दंड न आकारता मुदतवाढ द्यावी, अशी मागणी नगरसेवक अजय गोंदावळे यांनी केली. मात्र, ठाकरे शिवसेनेचे देवेंद्र टेमकर आणि शिवसेना शिंदे गटाचे बाबू कुडतरकर यांनी, “अनेक ठेकेदार ‘बिलो दरात’ (अंदाजित रकमेपेक्षा कमी दरात) कामे घेत असल्यामुळे कामांचा दर्जा ढासळत आहे,” असा गंभीर आरोप केला. यावर आक्रमक होत नगराध्यक्षांनी यापुढे बिलो दरात कामे देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले.
​पाणीपुरवठा, गॅस पाईपलाईन आणि इतर महत्त्वाचे मुद्दे:
​सर्वोदय नगर आणि गणेश नगर येथे नळ पाणी योजना व गॅस पाईपलाईनचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असले, तरी खोदलेले रस्ते पूर्ववत न केल्यामुळे अपघातांचे सत्र सुरू आहे. त्यामुळे ही कामे त्वरित सुरू करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली. यावर ठेकेदारांशी बोलणे झाले असून तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश दिल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.
​एमएनजीएल कार्यालय: सावंतवाडीत एमएनजीएल (MNGL) कंपनीचे कार्यालय नसल्याने ग्राहकांना तक्रारी नोंदवण्यात अडचणी येतात. त्यामुळे शहरात तात्काळ कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका नीलम नाईक यांनी केली.
​ इंदिरा गांधी व्यापारी संकुलात एकाच व्यक्तीच्या नावे दोन गाळे असल्याच्या मुद्यावरून आणि त्यांचे सील तोडण्याच्या व नोटीस देण्याच्या कारण यांवरून मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी धारेवर धरले. या प्रकरणी कडक पावले उचलली जातील, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
शहरात मच्छी मार्केटची सुंदर इमारत उपलब्ध असतानाही गवळीतिठा ते भटवाडी रस्त्यार परिसरात विक्रेते उघड्यावर मच्छी विकत असल्यामुळे वाहतूक कोंडी आणि दुर्गंधीची समस्या निर्माण होत आहे, असा मुद्दा नगरसेविका दिपाली भालेकर यांनी मांडला. त्यावर नगरपरिषदेने कारवाई करताना कोणीही राजकीय मध्यस्थी करू नये, असे आवाहन आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी केले. नगराध्यक्षांनी उघड्यावर मच्छी विकणाऱ्यांना नोटीस देण्याचे व मार्केट इमारतीशिवाय अन्यत्र मच्छी विक्री होणार नाही, याची काटेकोर खबरदारी घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. तसेच मच्छी मार्केटमधील महिला विक्रेत्यांसाठी बोरवेल आणि शौचालयाची सोय तातडीने उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले.
​याशिवाय, शहरातील काही प्राणिप्रेमींकडून न शिजवलेले कोंबड्याचे पाय उघड्यावर कुत्र्यांना घातले जात असल्याने निर्माण होणाऱ्या त्रासाबद्दल विचारणा करायला गेलेल्या नगरसेवकावरच महिलेने तक्रार केल्याच्या प्रकारावर नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला. अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत नगराध्यक्षांनी दिले आहेत.

शेअर करा