तीन वर्षांखालील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आठ माहितीपर स्टॉल; पालकांना मार्गदर्शन
बांदा,दि.०५ नोव्हेंबर
बालकांच्या आयुष्यातील पहिली तीन वर्षे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने पालकांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने वाफोली येथे ‘नवचेतना बाल मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले. एकात्मिक बालविकास सेवा योजना, सावंतवाडी अंतर्गत अंगणवाडी वाफोली नं. १, बीट बांदा-२ येथे ग्रामपंचायत वाफोलीच्या सहभागातून हा उपक्रम उत्साहात पार पडला.
नवचेतना उपक्रमांतर्गत आठ माहितीपर स्टॉल उभारण्यात आले होते. यामध्ये शून्य ते तीन वर्षे वयोगटातील बालकांची शारीरिक, बौद्धिक, भाषिक, सामाजिक व भावनिक वाढ, विकासाचे विविध टप्पे तसेच विकास पत्रकाद्वारे नियमित निरीक्षण करण्याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. योग्य पोषण, प्रेमळ संगोपन, वयानुरूप खेळ आणि बालकांशी संवाद यांचे महत्त्वही पटवून देण्यात आले.
यावेळी सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, ग्रामपंचायत सदस्य साक्षी शिरोडकर, पर्यवेक्षिका छाया घाडीगावकर, ममता देसाई, सोनाली जाधव, केंद्रप्रमुख अमोल पाटील, प्रथम संस्थेच्या जिल्हा समन्वयक अंकिता लोखंडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यवान सावंत, मुख्याध्यापिका शुभेच्छा सावंत उपस्थित होते.
अंगणवाडी सेविका सुवर्णा नारायण नाईक, तृप्ती संतोष परब, वाफोलीतील अंगणवाडी मदतनीस आणि बीट बांदा-२ मधील सर्व अंगणवाडी सेविकांनी उपक्रमात सहभाग घेतला. ग्रामपंचायत, अंगणवाडी, पालक आणि समुदाय यांच्या समन्वयातून बालकांच्या निरोगी भविष्याचा पाया मजबूत करण्याचा संदेश या मेळाव्यातून देण्यात आला.




