Kankavli News:संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वागदे येथे कच्च्या बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ

शेअर करा

डॉक्टर्स फ्रायडे क्लब’, वागदे व आशिये ग्रामपंचायतींचा संयुक्त पुढाकार; गडनदीपात्रात श्रमदानातून जलसंधारणाचा उपक्रम

कणकवली,दि.१८ ऑक्टोंबर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या काळात संभाव्य पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा भूजल पातळी वाढविण्यासाठी उपयोग व्हावा, या उद्देशाने जिल्ह्यात कच्चे बंधारे उभारण्याचे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ‘डॉक्टर्स फ्रायडे क्लब, कणकवली’, वागदे ग्रामपंचायत आणि आशिये ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वागदे येथील गणपती मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या गडनदीपात्रात बंधारा बांधण्याच्या कामाचा शुभारंभ डॉ. संदीप नाटेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आला.
यावेळी डॉ. स्वप्नील राणे,वागदे सरपंच संदिप सावंत, आशिये सरपंच महेश गुरव, समीर प्रभुगावकर, डॉ. प्रवीण बिरमोळे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. नितीन शेट्ये, डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. विनय शिरोडकर, डॉ. बी. जी. शेळके, डॉ. मिलिंद तेली, डॉ. डेनिस नाडर, डॉ. चंद्रकांत पुरळकर, डॉ. निलेश पेंडुरकर, डॉ. अविनाश पाटील, डॉ. अभिजित कानसे, डॉ. अभिजित आपटे आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती लक्षात घेता जलसंधारणाच्या कामांना गती देणे आवश्यक आहे. पावसाळ्यात नदी-नाल्यांमधून वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्यासाठी कच्चे बंधारे महत्त्वपूर्ण ठरतात. या माध्यमातून भूजल पातळी वाढण्यास मदत होण्याबरोबरच परिसरातील विहिरी आणि अन्य जलस्रोतांना लाभ होऊ शकतो. याच सामाजिक जाणीवेतून वागदे येथे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

शेअर करा