कणकवली : पाच वर्षांखालील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहता कामा नये : पालकमंत्री नितेश राणे

शेअर करा

कणकवलीत पालकमंत्र्यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

कणकवली,दि.२८ जून

भारताला पोलिओमुक्त देशाचा दर्जा मिळाला असला तरी तो कायम राखण्यासाठी जनसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पालकाने आपल्या बालकाचे लसीकरण करून घ्यावे. कोणतेही बालक या मोहिमेपासून वंचित राहणार नाही, यासाठी आरोग्य यंत्रणा आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करावे. पोलिओमुक्त भारताचा दर्जा कायम राखण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी केले.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या जिल्हास्तरीय शुभारंभप्रसंगी उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रांताधिकारी जगदीश कातकर, जिल्हा आरोग्य अधिकारी सई धुरी, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,तालुका आरोग्य अधिकारी प्रणोती इंगवले, नगराध्यक्ष संदेश पारकर, वैद्यकीय अधीक्षक सचिन डोंगरे, डॉ. पंकज पाटील, डॉ. माधव उबाळे, आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे, ज्येष्ठ पत्रकार काका करंबेळकर, संजय कामतेकर, शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेविका मेघा गांगण, तसेच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील २७ हजार ८०६ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हाभरात ९०४ लसीकरण केंद्रे, ८० मोबाईल पथके आणि ४३ ट्रान्झिट पथके कार्यरत आहेत. दुर्गम भाग, स्थलांतरित कुटुंबे, वीटभट्ट्या आणि बांधकाम स्थळांवरील बालकांपर्यंत विशेष पथकांद्वारे लसीकरण सेवा पोहोचविण्यात येणार असून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले.

शेअर करा