विविध संघटनांच्या प्रतिनिधींकडून लाठीहल्ल्याचा जाहीर निषेध : केंद्र सरकारविरोधात हाल्लाबोल
कणकवली,दि.२३ जुलै
शिक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, लोकशाहीहितवादी नागरिकांच्या एकजूटीचा विजय असो, पेपर लीक व विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करणाऱ्या सरकारचा निषेध असो, अशी घोषणाबाजी करीत नीट पेपर फुटी व दिल्लीतील जंतरमंतर आंदोलनात विद्यार्थ्यांवर सरकारने केलेल्या हिंसक कारवाईचा निषेधार्थ लोकशाहीवादी नागरिक आणि पुरोगामी संघटनांनी बुद्धविहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून आप्पासाहेब पटवर्धन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश रॅली काढली. या रॅलीची सांगता प्रांताधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली. त्यानंतर झालेल्या सभेत विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी पेपर फुटी व दिल्लीतील जंतरमंतर आंदोलनातील युवकांवर झालेल्या लाठीहल्याचा जाहीर निषेध केला. केंद्र सरकारविरोधात हल्लाबोल केला.
पेपर फुटीच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतरमंतरवर शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणाºया विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज मुळे अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी जखमी झाले आहेत. केंद्र सरकारने केलेल्या या दडपशाहीच्या निषेधार्थ लोकशाहीवादी नागरिकांनी व पुरोगामी संघटनांनी एकत्र येत कणकवलीत आक्रोश रॅली काढली. या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा, भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग जिल्हा,संविधानवादी, आंबेडकरवादी, बहुजनवादी, सिटू संघटना, अनुभव शिक्षण केंद्र, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, विविध समविचारी राजकीय पक्ष, संघटना, ृराजगृहाचे निष्ठावंत, बाळासाहेब आंबेडकर प्रेमी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष तथा समाजभूषण तानाजी कांबळे , वंचितचे जिल्हा पक्षीय निवडणूक निरीक्षक विश्वनाथ कदम, राष्टÑवादी (श.पा.)चे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख तथा उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर, माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, मनसेचे दया मेस्त्री, मनसेचे तालुकाध्यक्ष शांताराम सादये, सिटूच्या विजयराणी पाटील, विनोद पाटील, संविधानिक हितकारी संघटनेचे महेश परुळेकर, तरंदळे सरपंच सुशील कदम, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, नितीन वाळके, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष राजेंद्र मुंबरकर, सचिव विनायक मेस्त्री, डी. के. पडेलकर, इंजि. अनिल जाधव, अॅड. सुदीप उर्फ भाई कांबळे, अंकुश कदम, संदीप कदम, अनंत हजारे, राहुल कदम, स्वाती तेली, धीरज मेस्त्री, उत्तम लोके, अनुभव युवा मंचच्या बुशरा बागवान, फिजा मकानदार, सहदेव पाटकर, प्रसाद मुंज यांच्यासह या रॅलीत नागरिक सहभागी झाले होते. रॅलीचे रुपांतर प्रांताधिकारी कार्यालयासमोर सभेत झाले. या विविधि संघटनांच्या प्रतिनिधींनी सरकारविरोधात हल्लाबोल केला. त्यानंतर लोकशाहीहितवादी नागरिक व विविध संघटनांचा प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. नीट पेपरफुटीची व त्यामुळे झालेल्या विद्यार्थी आत्महत्येची नैतिक जबाबदारी स्वीकारून देशाचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा., दिल्लीच्या जंतरमंतर येथील विद्यार्थी आंदोलकांवर हिंसक लाठीचार्ज करणाºया पोलीस अधिकाºयांवर कारवाई करण्यात आली. विद्यार्थी आंदोलकांवर लाठीचार्ज करणाºया पोलिसांसमवेत साध्या कपडयात काही तरूणही लाठीचार्ज करीत होते, त्यांचाही तपास करून कारवाई करण्यात यावी. दिल्लीतील जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलने मोर्चा झाले आहेत. त्या मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत, सरकारी शाळा बंद करण्याचे धोरण सरकारने तातडीने मागे घ्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या.