कणकवली विधानसभा क्षेत्राची तिरंगा रॅली ; रॅलीत खा. नारायण राणे , पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती
कणकवली,दि.१४ ऑगस्ट
भारत माता की जय आणि वंदे मातरम् म्हणताना प्रत्येकाच्या मनात देशाबद्दलचा अभिमान जागृत झाला पाहिजे. केवळ एका दिवसापुरता देशाभिमान न ठेवता वर्षातील ३६५ दिवस देशाबद्दल अभिमान वाटला पाहिजे. आपल्या आयुष्यात पद, प्रतिष्ठा किंवा डिग्री कोणतीही असली तरी त्याआधी आपण भारतीय आहोत, ही ओळख महत्त्वाची आहे. देश सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाची आहे. अखंड भारत दिनाच्या निमित्ताने आपण एकत्र आलो असून अखंड भारताचे स्वप्न प्रत्येक भारतीयाने पाहिले आहे. हे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता आणि धमक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या हर घर तिरंगा अभियानांतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कासार्डे ब्रिज ते तळेरे बसस्थानक पर्यंत भव्य रॅली काढत नंतर सभेत रुपांतर करण्यात आले. यावेळी खासदार नारायण राणे, माजी आ. अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, जि. प. सदस्य मनोज रावराणे, सुप्रिया मेस्त्री,संतोष पारकर, बबलू सावंत, पंढरी वायंगणकर, विशाल कामत, सुरेंद्र कोदे, महेश गुरव,रविराज मोरजकर, चंद्रकांत डामरे, सर्वेश दळवी, सागर राणे, संतोष गुरव, सचिन पारधिये, दीपक मेस्त्री, प्रदीप गावडे, किशोर राणे, राकेश राणे, स्वप्रिल चिंदरकर, प्रकाश पारकर, महेश सावंत, संदीप साटम, नितीन गावकर, चारु साटम, बाबू गायकवाड, संजय कामतेकर, दादू राणे, संदीप सावंत, समीर सावंत, पप्पू पुजारे, समीर सावंत, शिवा राणे, प्रभाकर राणे, सुभाष मालंडकर, सावी लोके, मेघा गांगण यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील देशप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या तिरंगा रॅलीमध्ये हातात तिरंगा घेऊन शेकडो देशभक्त नागरिक, विद्यार्थी, माजी सैनिक तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी भारत माता की …. जय , वंदे मातरम , छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय ,हर हर महादेव , राष्ट्र प्रथम… सदैव प्रथम, तिरंग्याचा मान राखूया… भारताचा अभिमान वाढवूया , तिरंगा उंच राहू दे…. भारत महान होऊ दे,अशा घोषणांनी रॅलीचा मार्ग दुमदुमून गेला होता. शाळांमधील विद्यार्थीही हातात तिरंगा घेऊन रॅलीत सहभागी झाले होते, तर काहीनी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची वेशभूषा केली होती. त्यामुळे ही रॅली लक्षवेधी ठरत होती.
मंत्री नितेश राणे म्हणाले, राष्ट्रगीत किंवा वंदे मातरम् म्हणण्यावरून काही जण गोंधळ घालत आहेत. प्रत्येक भारतीयाने ‘वंदे मातरम्’ म्हटले पाहिजे आणि त्याचा सन्मान राखला पाहिजे. वंदे मातरमचा अपमान करणाऱ्यांविरोधात भारतीय म्हणून प्रत्येकाने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली पाहिजे. तिरंगा हा प्रत्येक भारतीय नागरिकाची ओळख आहे. जगाच्या पाठीवर कुठेही गेल्यानंतर स्वतःचे नाव सांगण्याआधी ‘मी भारतीय आहे’ अशी ओळख अभिमानाने सांगितली पाहिजे. हातातील तिरंग्याचा मान आणि त्याचा अभिमान प्रत्येक भारतीयाच्या मनात असणे अत्यंत आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाच्या कानाकोपऱ्यात तिरंगा यात्रा आयोजित होत आहेत. देशभक्त नागरिक म्हणून आपण या यात्रेत सहभागी झालो आहोत.
दरम्यान ना. नितेश राणे यांनी तिरंगा रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याबद्दलचा अभिमान व्यक्त केला. लहान शाळकरी मुलांपासून सैनिकांपर्यंत आणि तिन्ही तालुक्यांतील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपर्यंत विविध स्तरातील नागरिक भारतीय म्हणून या रॅलीत सहभागी झाल्याबद्दल नितेश राणे यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी तिरंगा रॅलीत जिल्हा समन्वय संदीप गावडे , जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आ. अजित गोगटे यांनी मार्गदर्शन केले. भारताचे राष्ट्रगीत वंदे मातरम ने समारोप करण्यात आला.