कणकवली : प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त गौरवपूर्ण सत्कार

शेअर करा

कणकवली ,दि.०२ जुलै

शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील ग्रामीण विकास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीप्रित्यर्थ महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त डॉ. राजश्री साळुंखे यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न झाला.

प्रा. डॉ. मुंबरकर यांनी तब्बल ३४ वर्षे कणकवली महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली. ग्रामीण विकास विषयाचे अभ्यासू आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख होती. अप्पासाहेब पटवर्धन यांच्या कार्यावर त्यांनी पीएच.डी. संशोधन केले असून ते अनेक वर्षांपासून गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.

सेवाकाळात त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना (NSS), जिमखाना, परीक्षा विभाग, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग अशा विविध विभागांत उल्लेखनीय योगदान दिले. तसेच मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना, महिला विकास कक्ष, विद्यार्थी विकास कक्ष सल्लागार समिती, ग्रामीण विकास अभ्यास मंडळ तसेच आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे क्षेत्र समन्वयक म्हणून विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. राष्ट्रीय सेवा योजनेतील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना २००७ मध्ये मुंबई विद्यापीठाचा जिल्हास्तरीय ‘आदर्श कार्यक्रमाधिकारी’ पुरस्कार मिळाला होता.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजश्री साळुंखे होत्या. यावेळी प्र. प्राचार्य युवराज महालिंगे, पर्यवेक्षक महादेव माने, विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. सोमनाथ कदम, कार्यालय अधीक्षक संजय ठाकूर यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. राजश्री साळुंखे यांनी आपल्या मनोगतात प्रा. डॉ. मुंबरकर यांच्या कार्याचा गौरव करताना, “त्यांच्यासारखे सेवाभावी आणि आदर्श शिक्षक समाजासाठी प्रेरणादायी आहेत. बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर करून सहकाऱ्यांतील चांगले गुण आत्मसात करणे आवश्यक आहे,” असे सांगितले.

प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी आपल्या मनोगतात अत्यंत सामान्य परिस्थितीतून शिक्षण घेऊन उच्च पदापर्यंत पोहोचण्याची प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातून मिळाल्याचे सांगितले. सेवाकाळात लाभलेल्या सर्व सहकाऱ्यांचे ऋण कधीही विसरता येणार नसल्याची भावना व्यक्त करत, कै. केशवराव राणे यांनी ग्रामीण भागात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळेच आपल्याला प्राध्यापक म्हणून कार्य करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ लिपिक मंगेश आरेकर यांनी केले, तर आभार प्रा. विजयकुमार सावंत यांनी मानले. समारंभास कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा