कणकवली : प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांची दूरदर्शन सह्याद्री आणि आकाशवाणीवर विशेष मुलाखत

शेअर करा

अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य विचारावर सखोल चिंतन

कणकवली,दि.३१ जुलै
ज्येष्ठ साहित्यिक,साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख, मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य, लेखक आणि अण्णा भाऊ साठे साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांची विशेष मुलाखत दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
दूरदर्शन सह्याद्रीवरील ‘शब्दांच्या वाटेवर’ या विशेष कार्यक्रमात निवेदिका पूनम चांदोरकर यांनी प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांची ‘अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आणि विचार’ या विषयावर सखोल मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यनिर्मितीची प्रेरणा, व्यक्त झालेले सामाजिक तत्त्वज्ञान, मानवतावादी विचार, समता-स्वातंत्र्याची मूल्ये तसेच त्यांच्या साहित्याचे समकालीन महत्त्व यांचा अभ्यासपूर्ण ऊहापोह करण्यात आला आहे.
ही मुलाखत सोमवारी सायंकाळी ८.३० वाजता तसेच मंगळवारी दुपारी २.३० वाजता दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग केंद्रावरही अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त ‘अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे तत्त्वज्ञान’ या विषयावर प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांची विशेष मुलाखत प्रसारित केली जाणार आहे. ही मुलाखत निवेदक सचिन दर्पे यांनी घेतली असून, त्यामध्ये अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यामागील वैचारिक अधिष्ठान, सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तनवादी दृष्टीकोन यांचे विविध पैलू उलगडण्यात आले आहेत.
कथाकार, कादंबरीकार, लोकशाहीर, कलावंत आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रखर पुरस्कर्ते अशा विविध अंगांनी अण्णा भाऊ साठे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि साहित्यविश्वाचा परामर्श या दोन्ही मुलाखतींमधून घेण्यात आला आहे. संशोधनाधिष्ठित आणि अभ्यासपूर्ण मांडणीमुळे अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा व्यापक सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक आशय रसिकांसमोर नव्या दृष्टिकोनातून उलगडणार आहे.
कणकवली महाविद्यालयातील प्रा.डॉ. सोमनाथ कदम यांनी अण्णा भाऊ साठे यांचे महत्त्वाचे पैलू मुलाखतीतून पुढे आणले आहेत या वैविध्यपूर्ण योगदाना बद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन डॉ. अनंत नागवेकर ,सचिव श्री विजयकुमार वळंजू ,सर्व संस्था पदाधिकारी,प्र प्राचार्य युवराज महालिंगे ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
यांनी डॉ. सोमनाथ कदम यांचे अभिनंदन केले आहे.
अण्णा भाऊ साठे यांच्यावर प्रेम करणाऱ्या साहित्यप्रेमी, संशोधक, विद्यार्थी तसेच सर्व रसिकांनी दूरदर्शन सह्याद्री आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग केंद्रावरील या विशेष मुलाखतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा