कणकवली,दि.०२ जुलै
महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या पुढाकाराने पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शिवडाव माध्यमिक विद्यालय, नरडवे इंग्लिश स्कूल, माध्यमिक विद्यालय नाटळ आणि शंकर महादेव विद्यालय, कुंभवडे येथील शेकडो विद्यार्थ्यांना रक्तचंदनाच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना सतीश सावंत यांनी, “शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन केले. हवामान बदल, वाढते तापमान, अवेळी पाऊस आणि दुष्काळ यांसारख्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर वृक्षलागवड हा प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी सांगितले.


या उपक्रमामागील उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे हा असून, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहनही करण्यात आले. रक्तचंदन हा आर्थिक, औषधी आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष असल्याने त्याची लागवड भविष्यात हरित पर्यावरण निर्मितीस हातभार लावणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हरित सिंधुदुर्ग घडविण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
यावेळी हरकुळ बुद्रुकचे सरपंच आनंद ठाकूर, तुषार सावंत, हनुमंत घाडीगावकर, एकनाथ सावंत, अंकुश सावंत, कुंभार सर, माध्यमिक विद्यालय नाटळचे चेअरमन नितीन सावंत, मुख्याध्यापिका प्रणिता तेली, मिलिंद डोंगरे तसेच संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.