मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी स्वत: घेतली कुटुंबियांची भेट ; माजी जि.प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या प्रयत्नांना यश
कणकवली,दि.२७ मे
सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली पागावाडी येथील वृद्ध व निराधार महिला जनाबाई धोंडू पाटील यांच्या बिकट परिस्थितीची माहिती समजताच युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संजना संदेश सावंत यांनी तत्काळ त्यांच्या घरी भेट देत तीन महिने पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचा हात दिला होता. त्यांच्या या परिस्थितीबाबत व पडक्या घराबद्दल वृत्त प्रसिध्द होताच या घटनेमुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेतली. स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी पाटील कुटुंबियांची भेट घेत माहिती घेतली. जिल्हा परिषद घर दुरुस्ती योजनेतून तात्काळ 20 हजार रुपयांची मदत देण्याच्या सुचना प्रशासनाला श्री. खेबुडकर यांनी दिल्या आहेत.
तसेच निराधार महिला जनाबाई धोंडू पाटील यांच्या स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.यामध्ये सर्वप्रथम ग्रामपंचायतीमार्फत तत्काळ सिमेंट पत्र्याचे शेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जिल्हा परिषद योजनांमधून घर दुरुस्तीसाठी २० हजारांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. याशिवाय संबंधित कुटुंबाला पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित कुटुंब दारिद्र रेषेखालील असून त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन तातडीने मदतीचे पाऊल उचलण्यात आले आहे. कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टीने आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी करण्यात येणार असून मुलाच्या टीबी आजारासाठी उपचार सुरू करून मोफत औषधोपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच संजय गांधी निराधार योजनेंतर्गत पेन्शनचा लाभ मिळवून देण्यासाठीही प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. महिलांसाठी असलेल्या पंतप्रधान महिला सन्मान योजनेंतर्गत नोंदणी प्रक्रिया करण्यात येणार असून शेतकरी संबंधित लाभ मिळावेत यासाठी ॲग्री स्टॅक नोंदणीही करण्यात येत आहे. याशिवाय अंत्योदय योजनेंतर्गत संबंधित कुटुंबाला दरमहा मोफत ३५ किलो धान्य उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे.शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या पुढाकाराचे परिसरातून स्वागत होत आहे.
दरम्यान , सर्वप्रथम पाटील कुटुंबियांच्या या परिस्थितीबाबत दखल घेवून युवा प्रतिष्ठानच्यावतीने जीवनावश्यक वस्तुंची भेट देण्यात आली. त्यानंतर प्रशासनाच्या माध्यमातून मदत मिळण्यासाठी युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने माजी जि.प. अध्यक्षा संजना सावंत यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून पाटील कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.