कणकवली,दि.०१ जुलै
जिल्ह्यात सुरू असलेल्या वादळी पावसामुळे विविध ठिकाणी मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
कणकवली तालुक्यातील शिर्पे सजातील चिंचवली येथे २९ जून रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी पावसात शंकर तुकाराम पेडणेकर यांच्या घरावर झाडाची फांदी पडली. या घटनेत घरावरील १० फुटी पाच सिमेंट पत्र्यांचे नुकसान झाले असून, अंदाजे ₹३,५०० रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद आहे.
वैभववाडी तालुक्यात ३० जून रोजी लोरे येथील मोहन शंकर तांबे यांच्या घरावर झाड कोसळल्याने घरावरील दोन पत्र्यांचे नुकसान झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मालवण तालुक्यातील मोगरणे गावडेवाडी येथील संदेश नारायण गावडे यांच्या घरालगतची संरक्षक भिंत कोसळून मोठे नुकसान झाले. भिंत रस्त्यावर कोसळल्याने परिसरात काही काळ धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती.
सततच्या पावसामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी तसेच झाडे, जुन्या भिंती आणि धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

