कणकवली : नांदगाव तिठा असलदे नं. ४ शाळेत विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाचे धडे

शेअर करा

बांधावरची शाळा’, ‘शालेय स्वराज्य मंत्रिमंडळ २०२६’ , ‘रानभाजी महोत्सव’ उत्साहात..

कणकवली,दि.२२ जुलै

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव तिठा असलदे नं. ४ येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ‘बांधावरची शाळा’, ‘शालेय स्वराज्य मंत्रिमंडळ २०२६’ तसेच ‘रानभाजी महोत्सव’ अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांना शेती, लोकशाही, व्यवहारज्ञान, आरोग्य आणि पारंपरिक आहाराचे महत्त्व समजावून देण्यात आले.

‘बळीराजासाठी एक दिवस – बांधावरची शाळा’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतावर नेऊन शेतीविषयक माहिती व प्रात्यक्षिक देण्यात आले. शाळेचे उपाध्यक्ष विजय खरात आणि पालक रुपेश खरात यांच्या शेतावर विद्यार्थ्यांनी भेट देत शेतीची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना विविध झाडे, रोपे व वेलींची ओळख करून देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना खिरी व बुंदी लाडूचे वाटप करण्यात आले.

तसेच २० जुलै रोजी शाळेत ‘शालेय स्वराज्य मंत्रिमंडळ २०२६’ निवडणूक घेण्यात आली. मुख्यमंत्रीपदी कु. वेदांत विजय खरात, तर उपमुख्यमंत्रीपदी कु. मोहम्मद हुसेन सद्दाम बटवाले यांची निवड झाली. शिस्तमंत्री म्हणून कु. अबरार इमाम नावळेकर, सांस्कृतिक मंत्री कु. सर्वेश संतोष खरात, आरोग्यमंत्री कु. फहादरजा सिराज नावळेकर, स्वच्छता मंत्री कु. सफवान सय्यद फरास यांची निवड झाली. क्रीडामंत्री म्हणून कु. रुमेसा इरफान नावळेकर व कु. निर्वी समीर मोरे यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून दिनेश जंगले सर व रश्मी कुडतरकर मॅडम यांनी काम पाहिले.

याच दिवशी शाळेत ‘रानभाजी महोत्सव’ उत्साहात पार पडला. पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विद्यार्थ्यांना विविध रानभाज्यांची ओळख करून दिली. रानभाज्यांचे आहारातील महत्त्व तसेच त्यांचे आयुर्वेदिक व गुणकारी उपयोग याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. पालकांनी विद्यार्थ्यांकडून रानभाज्या खरेदी करून त्यांना व्यवहारज्ञानाचे धडे दिले.

या सर्व उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इमाम नावळेकर, उपाध्यक्ष विजय खरात, मुख्याध्यापक दिनेश जंगले व शिक्षिका रश्मी रविंद्र कुडतरकर यांचे विशेष सहकार्य लाभले. पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हे उपक्रम आनंददायी आणि मार्गदर्शक ठरले.

शेअर करा