जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संघटना व युवा संदेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून वह्यांचे वाटप
कणकवली ,दि.२९ जून
आशिये गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संघटना व युवा संदेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत वह्यांचे वाटप करण्यात येत आहे. आशिये प्राथमिक शाळेची इमारत पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून अद्यावत अशी उभारण्यात आलेली आहे. या गावातील विद्यार्थ्यांच्या असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आशिये ग्रामपंचायत काम करत आहे. जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे हे निस्वार्थीपणे शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक बांधिलकीचे काम करत आहेत. तसेच युवा प्रतिष्ठानचे गोट्या सावंत यांनी देखील या वह्यांची उपलब्धता करुन दिली. त्यामुळे पुढील काळात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवत गावाचे नाव लौकिक करावे , असे प्रतिपादन सरपंच महेश गुरव यांनी केले.
आशिये पूर्ण प्राथमिक शाळा येथे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संघटना व युवा संदेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत वह्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके , उपसरपंच संदीप जाधव , माजी सरपंच शंकर गुरव , ग्रा.प.सदस्य सुहास गुरव , शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष संजय बाणे , मुख्याध्यापिका वृषाली मसुरकर , श्रीमती सामंत मॅडम , श्री.कदम आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके म्हणाले , विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच शैक्षणिक उन्नतीसाठी मेहनत घेतली पाहिजे. गावचे सरपंच महेश गुरव हे गावातील विद्यार्थ्यांसाठीनेहमी शैक्षणिक उपक्रम राबवित आहेत. ख-या अर्थाने शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच वह्या वाटप करत विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीतुन मदतकार्य केले आहे. आशिये गाव म्हटल्यावर नेहमी कुठल्याही कामासाठी महेश गुरव यांची असलेली तळमळ ही अशा सामाजिक उपक्रमांमधुन दिसुन येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत.
शंकर गुरव म्हणाले , विद्यार्थी असल्यापासून प्रत्येकाने शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार आत्मसात केले पाहिजेत. गावातील आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहोत. गावचे भविष्य आपल्या हातात आहे. त्यामुळे मोठे झाल्यानंतर आपल्या गावासाठी काम केले पाहिजे.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक श्री.कदम यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका वृषाली मसुरकर यांनी मानले.