कणकवली,दि.२८ मे
सिंधुदुर्ग जिल्ह््याचे पालकमंत्री नितेश राणे आणि केंद्रापासून राज्यापर्यंत सत्तेत असलेल्या राणे कुटुंबाचे कोणीच अधिकारी ऐकत नाहीत, हे पालकमंत्र्यांचे बंधू आमदार नीलेश राणे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांबाबत पोलीस अधीक्षकांवर केलेल्या आरोपांवरुन स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे सुरू असल्याचे विरोधी पक्ष सांगत होते, तेच पालक यांचे बंधू आता बोलत आहेत. याचा अर्थ पालकमंत्र्यांच्या आदेशाला अधिकाºयांनी केराची टोपली दाखवली आहे, अशी टीका ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली.
येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. उपरकर बोलत होते. श्री. उपरकर म्हणाले, सिंधुदुर्गच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्यावरील कारवाईबद्दल विधिमंडळात विषय येऊनही त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्याबाबत पत्र देण्यात आले, याचा अर्थ जि.प. ने ठरावाने दिलेली माहिती खोटी आहे का? हे पाहता पालकमंत्री त्याकडे लक्ष देत नाहीत. दहावी-बारावी निकालानंतर प्रत्येक तहसील कार्यालयात तातडीने दाखले देण्याची यंत्रणा उभारणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले गेले. मंगळवारी यांनी तहसील सेतू केंद्रातील माजी आ. वैभव नाईक कणकवली मौगळ कारभाराबाबत आवाज उठवला. कणकवली तहसीलदार तक्रारींची खातरजमा करण्यासाठी कार्यालयाबाहेर पडत नाहीत. ते कार्यालयाच्या वेळेबाहेर उशिरापर्यंत कार्यालयात उपस्थित असतात, त्याचे नेमके गौडबंगाल काय? असा सवाल उपरकर यांनी केला. कणकवली तहसीलदारांची बदली देवगड येथे करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. पालकमंत्र्यांना असेच सर्व अधिकारी लागतात. पालकमंत्री स्वत:ला हिंदू नेते समजतात, पण छत्रपतींच्या शिव मंदिराला दिवाबत्तीसाठी एक लाख आणि औरंगजेबाच्या कबरीला अडीच लाखाचे अनुदान शासनाने मंजूर केले. यावरून पालकमंत्र्यांचे स्वत: च्या जिल्ह्यातील शिव मंदिराकडे किती लक्ष आहे हे दिसून आले आहे. केवळ फसवेगिरी गिरी आणि स्टंटबाजी आहे. चौकशा लागलेले भ्रष्ट अधिकारी जिल्ह्यात प्रमुख पदांवर काम करतात, हे दुर्दैव असल्याची टीका श्री. उपरकर यांनी केली.
जिल्ह्याच्या विकासाबाबत पालकमंत्री पूर्णपणे असमर्थ ठरले आहेत. ते केवळ मोठमोठ्या घोषणा करतात, पण प्रत्यक्षात काहीच साध्य होत नाही. ओसरगाव टोल नाक्यावर ‘एमएच-०७’ पासिंगच्या वाहनांना टोल नको, अशी भूमिका जिल्ह्यातील जनतेची आणि सर्वपक्षीयांची सुरवातीपासूनच होती. त्यामुळे विरोधकांवर टीका करण्यापूर्वी पालकमंत्र्यांनी ते काँग्रेसमध्ये असताना त्यांनी काय केले होते, याचे स्मरण करावे, असा टोलाही श्री. उपरकर यांनी लगावला.