कणकवली,दि.१७ जुलै
कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायत मालकीच्या जुन्या व्यापारी मार्केटच्या पुनर्बांधणीसाठी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष संदेश पारकर आणि उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांची भेट घेत निवेदन दिले.
यावेळी राजेंद्र मनोहर पेडणेकर, राजू म्हापसेकर, अनिल मेस्त्री, दत्तप्रसाद बिडये, संतोष महाजन, अविनाश गावडे, बाबूराव घाडिगावकर, प्रभाकर कदम, सईद नाईक, प्रसाद पाताडे, जमिल कुरेशी, शाम सूर्यवंशी, योगेश पवार, बंडू कोदे, शेखर बाणे, महेश वायंगणकर, बाबुराव चहावाला, महेश मेस्त्री, हेमंत नाडकर्णी, भगवान कासले, मंगेश जाधव, नूरमहमद शेख यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.
यावेळी धोकादायक अवस्थेत असलेल्या व्यापारी इमारतीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच यापूर्वीच्या बैठकीत सांगितल्याप्रमाणे इमारतीतील गाळेधारक व खोकेधारकांची तपशीलवार माहिती नगराध्यक्षांना सादर करण्यात आली.आप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतीच्या मालकीची जुनी व्यापारी इमारत अत्यंत जीर्ण झाली असून ती कोसळण्याच्या स्थितीत आहे. पहिल्या मजल्यावरील भिंती आणि छप्पर कोसळले असून इमारतीचा एक बाजूचा स्लॅबही पडला आहे. त्यामुळे ही इमारत व्यापारी आणि नागरिकांच्या दृष्टीने धोकादायक बनली आहे.
या इमारतीमध्ये तळमजल्यावरील १३ गाळे, पहिल्या मजल्यावरील ३ गाळे आणि १ पत्राशेड अशा एकूण १७ गाळेधारकांसह ३६ खोकेधारक आहेत. हे सर्व नगरपंचायतीकडे नोंदणीकृत असून नियमितपणे भाडे भरत आहेत. तसेच गेली १० ते १५ वर्षे भाडेतत्त्वावर व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचाही नव्या संकुलात विचार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.