कणकवली :तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत विद्यामंदिर कणकवलीचा डंका

शेअर करा

पाच सुवर्ण, सहा रौप्य व दोन कांस्यपदकांची कमाई; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी चार खेळाडूंची निवड

कणकवली,दि.०७ सप्टेंबर

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या आयोजनाखाली तसेच तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग आणि विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या कणकवली तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि दोन कांस्यपदकांची कमाई केली. या उल्लेखनीय कामगिरीमुळे प्रशालेने तालुक्यात तायक्वांदो क्रीडा प्रकारात आपला दबदबा निर्माण केला आहे.

१४ वर्षांखालील मुलींच्या गटात २६ ते २९ किलो वजनी गटात मिताली कदम हिने प्रथम, भाविका माणरी हिने द्वितीय, तर आराध्या सबनीस हिने तृतीय क्रमांक मिळविला. ३८ किलोपेक्षा अधिक वजनी गटात पल्लवी गोगट हिने द्वितीय क्रमांक पटकावला.

१४ वर्षांखालील मुलांच्या गटात २५ ते २७ किलो वजनी गटात ओम सुनील राणे याने तृतीय क्रमांक मिळविला. ३५ ते ३८ किलो वजनी गटात जय ललित बावकर याने द्वितीय, तर ४१ किलोपेक्षा अधिक वजनी गटात प्रद्युम्न मुळदेकर याने द्वितीय क्रमांक मिळविला.

१७ वर्षांखालील मुलांच्या गटात ३५ किलो वजनी गटात श्रीपाद परब, ३५ ते ३८ किलो वजनी गटात प्रसन्न कांदळकर, ४८ ते ५१ किलो वजनी गटात चिराग रेपाक आणि ५१ ते ५५ किलो वजनी गटात श्रेयस नार्वेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. ५५ ते ५९ किलो वजनी गटात शिवांग पेडणेकर याने द्वितीय क्रमांक मिळविला.

१९ वर्षांखालील मुलींच्या ४० ते ४२ किलो वजनी गटात भक्ती कांदळकर हिने प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची सिंधुदुर्गनगरी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे या खेळाडूंकडून जिल्हास्तरीय स्पर्धेतही चमकदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक व पर्यवेक्षक अच्युतराव वनवे तसेच सुदिन पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ, कणकवलीचे चेअरमन डॉ. अनंत नागवेकर, सचिव विजयकुमार वळंजू, विश्वस्त अनिलपंत डेगवेकर, संस्था पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक पिराजी कांबळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.

शेअर करा