कणकवली शहरातील बिजलीनगर , कणकनगर , नाथ पै नगर , परबवाडी या प्रभागात नाईक कुटुंबियातील सदस्य सातत्याने निवडून आलेले आहेत. ज्यावेळी सर्वच आमच्या विरोधात होते. त्यावेळी देखील काही आम्ही उभे केलेल्या उमेदवारांचा विजय झालेला आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या विजयाबद्दल कोणाच्या सर्टिफिकिटची गरज नाही, हे लक्षात ठेवावे. समीर नलावडे हे निलेश राणेंवर बोलताना घाबरतात. गेल्या सत्ताधा-यांनी लोकांकडून पैसे घेतल्यामुळेच समीर नलावडे यांचा पराभव झाल्याचा आरोप उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केला.
कणकवली येथील उपनगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी नगरसेवक संकेत नाईक , जयेश धुमाळे उपस्थित होते.
सुशांत नाईक म्हणाले, माजी आ. वैभव नाईक हे देखील सातत्याने या प्रभांगांमध्ये जिंकलेले आहेत. लोकांशी आम्ही प्रामाणिकपणे जोडलेलो आहोत. गेली 10 वर्षे जरी आम्ही विरोधी पक्षात असलो तरी या लोकांची कामे केली. आम्ही ज्या मतदार संघात आम्ही सातत्याने निवडणुन आलो आहे.मागच्या निवडणुकीत सगळे आमच्या विरोधात असताना आम्ही निवडून आलेलो आहेत. गेली 20 वर्षे आम्ही या प्रभागांमध्ये निवडून येत आहोत. ज्यावेळी कणकवली शहराची निवडणूक लागली, तेव्हा संदेश पारकर यांना निवडणूक लढवावी म्हणून आम्ही साकडं घातले, त्यानुसार कणकवली शहर विकास आघाडी झाली. त्या शहर विकास आघाडीला सर्व पक्षीय व कणकवलीकरांचा पाठिंबा होता, तो आम्हाला सर्वांचा पाठिंबा होता. आमच्या विजयाबाबत कोणाच्या दाखल्याची आम्हाला गरज नाही . राणेंकडून पैसे घेतले याचा आरोप चुकीचा आहे. त्याउलट रविंद्र चव्हाण यांच्या कृपेने पैसे राणेंनी वाटले , असल्याचा टोला त्यांनी लगावला.
बॉक्स –
त्यामुळेच समीर नलावडे यांची होतेय चिडचिड –
आ.निलेश राणे आमच्या प्रभागात निवडणुकीत आले नाहीत. आम्ही कुठल्याही व्यासपीठावर एकत्र गेलो नाही. त्याचा एकतरी पुरावा आम्हाला दाखवावा . त्याउलट ज्या समीर नलावडेंचा पराभव झाला , त्याबाबत आ. निलेश राणे यांनी त्यांचा पराभव कुकर्मांमुळे झाला, असे म्हटले होते. कणकवली शहर भयमुक्त करण्यासाठी कणकवलीकरांनी माजी नगराध्यक्षांचा पराभव केला. त्याउलट वैभव नाईक यांना 50 कोटींची ऑफर आली होती.तरीही ते शिवसेनेची प्रामाणिक राहिले आहेत. त्यामुळेच जनता आमच्या सोबत आहे. काहीजण थेट आ. निलेश राणेंवर बोलायला घाबरतात.निलेश राणेंवर बोलता येत नाही. त्यामुळेच समीर नलावडे यांची चिडचिड होत असल्याचे दिसून येत आहे , असा टोला उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी लगावला.
आमच्या प्रभागांमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांना जास्त मताधिक्य मिळाले , हे दु:ख समीर नलावडे यांना आहे. त्याउलट गेल्या पाच – सहा वर्षात कोणाकडून पैसे घेतले,तेच पैसे पराजयाचे कारण झाले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर टीका करण्यापेक्षा स्वत: अपयशी कसे ठरलात , हे आपले भाऊ आ. निलेश राणे यांनी पुराव्यासहीत जाहिर करुन दाखवले आहे. पालकमंत्र्यांनी कुठला एकतरी प्रकल्प अस्तित्वात आणून सक्सेस केला आहे का ? अवैध गोवा बनावटीची दारु , गुटखा , ड्रग्ज व अवैध धंदे जोमात सुरु आहेत. जर गृहमंत्री यशस्वी काम करत असतील तर जिल्ह्यात तुमच्या अपयशामुळे हे अवैध धंदे सुरु आहेत का ? असा सवाल उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केला आहे.