ठेकेदार कंपनीला वारंवार सांगुनही वटवृक्ष न तोडल्याने ग्रामस्थ आक्रमक ; संबंधित कंपनीकडून नुकसान भरपाईची केली मागणी
कणकवली ,दि.१५ सप्टेंबर
देवगड निपाणी राज्य मार्गावर असलदे उगवतीवाडी येथील श्री साई सर्व्हिसिंग सेंटरच्या समोर असलेल्या मोडकळीस आलेल्या वडाच्या झाडाचा मोठा फांदा अचानक अंगावर कोसळल्याने असलदे मधलीवाडी येथील दुचाकीस्वार युवक वसंत उर्फ प्रतिक प्रकाश वाळके ( वय 25) याचा दुर्दैवी जागीच मृत्यू झाला.शिवाय दुचाकीच्या मागे बसलेला संदेश नरे याला गंभीर दुपाखत तर दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, असलदे गावातील जुनाट वटवृक्ष महामार्ग विकसित करणा-या कंपनीने तातडीने तोडावेत, अशी मागणी करुनही दुर्लक्ष केल्यामुळेच हा अपघात घडला, असा आरोप करत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे वाहतूक काहीकाळासाठी ठप्प झाली होती. हा अपघात दुपारी 1.45 वाजण्याच्या सुमारास असलदे येथे घडला.

याबाबत वृत्त असे की, मुंबईवरुन गणेशोत्सवासाठी असलदे येथे गावी आलेला वसंत उर्फ प्रतिक प्रकाश वाळके ,रा.असलदे ,मधलीवाडी हा आपल्या ताब्यातील अक्टीवा दुचाकी घेऊन नांदगाव तिठ्ठा येथे दूध आणण्यासाठी गेला होता. नांदगाव येथुन घरी परतत असताना येथील उगवतीवाडी येथील सर्व्हिसिंग सेंटर समोर देवगड निपाणी रस्त्यावर जुनाट वटवृक्षाचे झाड अचानक चालत्या दुचाकीवर कोसळले. त्यात वसंत उर्फ प्रतिक प्रकाश वाळके याचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीच्या मागे बसलेला संदेश सखाराम नरे ,रा. असलदे याने प्रसंगावधान ओळखून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. मात्र, त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. तर यावेळेस थोडेसे पुढे जाणा-या सारिका शिवाजी डामरे व शिवाजी रमेश डामरे, रा. असलदे डामरेवाडी याना फांदीचा मार लागल्याने ते सुध्दा जखमी झाले.यावेळेस या अपघाताची माहिती असलदे ग्रामस्थानी व स्थानिकांनी धाव घेत दुचाकीस्वार जागीच मयत झाल्याचे पाहताच गर्दी झाली. तसेच दुचाकीस्वार असलदे येथील असल्याचे समजल्यानंतर असलदे सह परिसरातील नागरीकांनी देवगड निपाणी रस्ता विकसित करत असलेल्या कंपनीच्या व्यवस्थापकाला धारेवर धरले. देवगड निपाणी रस्त्यावरील धोकादायक वटवृक्ष हटविण्यासाठी सांगितल्यानंतर हे वटवृक्ष हटविण्यात का आले नाही ? असा जाब विचारण्यात आला. यावेळी संतप्त कुटुंबिय व नागरिकांनी जो पर्यत मयताच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळणार नाही,सबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला. अखेर उशिरा सकारात्मक चर्चेतुन मार्ग काढण्यात आला.

या अपघाताची माहिती मिळाल्यानतंर पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नानचे, वृषाली बर्गे,देवगड पोलीस उपनिरीक्षक संदीप खाडे, सरपंच चंद्रकांत डामरे, पत्रकार भगवान लोके, जि.प.सदस्य संतोष पारकर, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, उपसरपंच सचिन परब, दयानंद हडकर,पंढरी वायगणकर,पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला संवाद –
असलदे येथील अपघातात मृत प्रतिक वाळके झाल्याचे समजल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार भगवान लोके व दिलीप तळेकर यांच्याशी संवाद साधला. घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे सांगत मदत केली जाईल, असे सांगितले. त्यानुसार दिलीप तळेकर यांनी वाळके कुटुंबिय व ग्रामस्थांची चर्चा करत सकारात्मक तोडगा काढला. त्यानंतर पोलीसांच्या मदतीने पडलेले झाड बाजुला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.