कणकवली,दि.१५ जुलै
युवा संदेश प्रतिष्ठानचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहे. यात प्राथमिक विभागातून पंढरीनाथ सावंत (नाधवडे, वैभववाडी) व माध्यमिक विभागातून संतोष सातार्डेकर, (एम आर. नाईक विद्यालय, कोणाळकट्टा, दोडामार्ग) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला.
शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप असून १९ जुलै रोजी कणकवली येथे सिंधुरत्न टॅलेंट सर्च मधील गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण कार्यक्रमात या पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी निवड झालेल्या दोन्ही गुणवंत शिक्षकांचे युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक संदेश ऊर्फ गोटया सावंत आणि युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संजना संदेश सावंत यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांमधून एक व माध्यमिक (हायस्कूल ) विभागातून एका शिक्षकांची निवड करण्यात येते. निवड करताना कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव न मागवता विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून या शिक्षकांची प्रतिष्ठानच्या तज्ज्ञ टीम कडून निवड करण्यात येते.