कुडाळ ,दि.३० जुलै
सद्यस्थितीत बहुसंख्य लोक तणावाखाली जीवन जगत असून अशा परिस्थितीत मानसिक व आध्यात्मिक बळ मिळवण्यासाठी गुरुकृपा आवश्यक आहे भारताच्या आध्यात्मिक परंपरेचा केंद्रबिंदू म्हणजे गुरु-शिष्य परंपरा होय. असं प्रतिपादन श्री. हेमंत मणेरुकर यांनी कुडाळ येथील गुरुपौर्णिमानिमित्त आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात बोलताना केले.
. सनातन संस्था सिंधुदुर्गच्या वतीने कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात ते वक्ते म्हणून बोलत होते. श्री. मणेरुकर म्हणाले, जेव्हा धर्माला ग्लानी आली, तेव्हा तेव्हा धर्मरक्षणाचे कार्य गुरु-शिष्य परंपरेनेच केले आहे. समाज चारही बाजूंनी विविध संकटांनी वेढला गेला असून कुटुंबव्यवस्थेलाही मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. लव्ह जिहाद हे एक गंभीर षड्यंत्र असून त्यात केवळ एक मुलगी बळी पडत नाही, तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते, असे त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर सनातन संस्थेने ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ हे जनजागृती अभियान सुरू केले असून ते घरोघरी व गावोगावी राबवले जात आहे. या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. येणाऱ्या काळात आध्यात्मिक बळ मिळवायचे असेल, तर कुलदेवतेची कृपा आवश्यक आहे. त्यासाठी रामकवच धारण करून रामभक्त बनूया आणि रामराज्याच्या स्थापनेसाठी कार्य करूया, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात वेदमूर्ती श्री. भूषण जोशी यांनी श्रीरामाच्या आदर्श जीवनावर आधारित मार्गदर्शन केले. श्रीराम जिथे आहेत तिथे यश आहे. ज्याच्या पाठीशी राम आहेत तो सर्वसामान्य माणूसही यशस्वी होऊ शकतो. श्रीरामासोबत अनेक पराक्रमी वीर असतानाही त्यांनी वानरसेनेच्या साहाय्याने युद्ध जिंकले, हे रामराज्याच्या तत्त्वज्ञानाचे मुख्य सूत्र असल्याचे त्यांनी सांगितले.
रामराज्याची सुरुवात स्वतःपासूनच व्हायला हवी. गुरु-शिष्य परंपरेत महर्षी व्यास यांचे कार्य अद्वितीय आहे. त्यांनी ज्ञान, विज्ञान, भूगोल, खगोल यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन करून मानवजातीला ज्ञानाचा अमूल्य ठेवा दिला. श्रीगुरू जीवनातील सर्वांगीण प्रगतीचा संदेश देतात आणि साधनामय जीवनासाठी दृढ विश्वास निर्माण करतात. साधनेत अहंनिर्मूलन अत्यंत महत्त्वाचे असून ‘मीपणाचा त्याग’ म्हणजेच अहंनिर्मूलन होय. जे गुरू व भगवंताला सर्वस्व अर्पण करतात, तेच जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी होतात, असे त्यांनी सांगितले.
राम आणि कृष्ण या अवतारी पुरुषांनीही आपल्या गुरूंना सर्वस्व मानले. त्यामुळे प्रत्येकाने गुरूंनी सांगितलेली साधना आचरणात आणली पाहिजे. सत्य बोलण्याचे सामर्थ्यही गुरुकृपेनेच प्राप्त होते, असे सांगत त्यांनी दीपक नावाच्या शिष्याच्या कथेच्या माध्यमातून आदर्श गुरु-शिष्य नात्याचे महत्त्व प्रभावीपणे स्पष्ट केले.
सनातन संस्था सिंधुदुर्गच्या वतीने जिल्ह्यातील सहा ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कुडाळ येथील कार्यक्रमाला सनातनचे संत सद्गुरू सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली. त्यांचा सन्मान बिबवणे येथील श्री. प्रसन्न कोरगावकर यांनी केला. यावेळी भोयाचे केरवडे येथील गुणवंत विद्यार्थी कु. नुतन संतोष परब ओरोस येथील गजानन रविंद्र परब, गोवेरी येथील गुणवंत विद्यार्थी कु. लक्ष्मण नंदकिशोर गावडे याचा सत्कार श्री चंद्रशेखर तुळसकर यांच्या हस्ते करण्यात आला. सकाळच्या सत्रात गुरुपूजन व आरती भावपूर्ण वातावरणात झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अंजली शिंदे यांनी केले. यावेळी 500 हून अधिक धर्माभिमानांची उपस्थिती होती. यावेळी हिंदू जनजागृती समिती आयोजित हर घरयोद्धा अभियानांतर्गत दाखवण्यात आलेली विविध प्रात्यक्षिके लक्षवेधी ठरली. सध्या स्थितीत महिला व मुली यांच्या बाबतीत घडणाऱ्या विविध प्रसंगांचा प्रतिकार कसा करावा हे विविध प्रसंगांच्या माध्यमातून दाखवण्यात आले.
