कुडाळ पोलिसांची मोठी कारवाई: संशयिताला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
कुडाळ दि.२४ जुलै
‘वेलनेस थेरपी कायरोप्रॅक्टर’ या नावाने कुडाळ रेल्वेस्टेशन परिसरात
उपचार केंद्र चालविणाऱ्या संतोष ज्ञानदेव सारंग (मूळ रा. सांताक्रुझ मुंबई, सध्या रा. कुडाळ रेल्वेस्टेशन रोड ईशांत कॉम्प्लेक्स) व्यक्तीविरुद्ध बोगस वैद्यकीय व्यवसाय केल्याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयित डॉक्टरला पोलिसांनी अटक करून कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सोमवार २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबतची माहिती कुडाळ प्रभारी पोलिस अधिकारी जयदीप पाटील यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत कुडाळच्या तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. १२ मार्च २०२६ रोजी कुडाळ पोलीस ठाण्यात एक निनावी अर्ज प्राप्त झाला होता. या अर्जामध्ये कुडाळ रेल्वेस्टेशन रोडवरील निर्मिती विशांत कॉम्प्लेक्समध्ये ‘वेलनेस थेरपी कायरोप्रॅक्टर’ या नावाने दवाखाना सुरू करून संतोष साटमकडून उपचार केले जात असल्याची माहिती देण्यात आली होती. हा अर्ज तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याकडे प्राप्त झाला होता. त्यानंतर त्यांनी सदर अर्ज पुढील चौकशीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे पाठविला होता.
जिल्हा आरोग्य विभागाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली. चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तीकडे महाराष्ट्र वैद्यकीय कौन्सिल बोर्डचे वैध प्रमाणपत्र आढळून आले नाही. तसेच महाराष्ट्र प्रबंधक अॅक्युपंक्चर परिषद, मुंबई यांच्याकडूनही संबंधित प्रमाणपत्रे व पदविकांबाबत अहवाल मागविण्यात आला. या अहवालानुसार, संबंधित वैद्यकीय प्रमाणपत्रे व पदविका यांची नोंदणी शासनाच्या नियमानुसार झालेली नसल्याचे स्पष्ट झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीने कोणतीही वैध वैद्यकीय पात्रता अथवा शासनमान्य नोंदणी नसताना रुग्णांवर उपचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सप्टेंबर २०२५ ते ३० मे २०२६ संतोष ज्ञानदेव सारंग याने रुग्णांना उपचार देऊन पर्यायाने शासनाचीही फसवणूक केली. तसेच रुग्णांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने उपचार केल्याचा आरोप आहे.
संबंधित व्यक्तीकडून उपचार घेतलेल्या नागरिकांनी कुडाळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच आपल्या परिसरात अशाप्रकारे वैद्यकीय पात्रता किंवा शासनमान्य नोंदणी नसताना उपचार करणारे बोगस डॉक्टर आढळल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असेही कुडाळ पोलीस ठाण्याच्या वतीने सांगण्यात आले आहे.