कुडाळ : वेताळ बांबर्डे-पावशी सीमेवर महामार्गावर जीवघेणा खड्डा

शेअर करा

ठेकदाराचे दुर्लक्ष; अपघाताला आमंत्रण

खड्ड्यातील खडी रस्त्यावर

कुडाळ,दि.२७ जुलै

वेताळ बांबर्डे-पावशी सीमेवर मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळच्या दिशेने जाताना मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा खोलवर असून येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत महामार्ग ठेकेदार मात्र सुशेगाद असल्याचे दिसून येत आहे.
वेताळ बांबर्डे ओव्हरब्रीज सोडल्यावर कुडाळच्या दिशेने जाताना हा खोलवर खड्डा पडला असून आतील खडी बाहेर येऊन महामार्गावर पसरली आहे. हा खड्डा वाहनचालकांना लांबून दिसत नसून यामुळे वाहन खड्ड्यात आपटून मोठी दुर्घटना घडू शकते. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी दुचाकीस्वाराला अंदाज न आल्याने अपघात घडला होता. यामध्ये दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली होती. मुख्य म्हणजे दोन दिवसांपूर्वीच ठेकेदाराने महामार्गावरील खड्डे बुजविले होते. त्या खड्ड्यांची स्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे. महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर असून ठेकेदार तात्पुरती मलमपट्टी करीत आहे. अशा जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघात वाढण्याची शक्यता असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे.

शेअर करा