कुडाळ : “मुहूर्तळी वाडीचे ‘माळीण’ होऊ देऊ नका!”

शेअर करा

वालावल दरड दुर्घटनेनंतर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांचा प्रशासनाला गंभीर इशारा

कुडाळ,दि.३० जून

कुडाळ तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काल सकाळी १० च्या सुमारास वालावल येथील मुहूर्तळी वाडीत दरड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत स्थानिक रहिवासी सुधाकर राऊळ यांचे घर अत्यंत धोक्यात आले असून, दरडीचा एक प्रचंड मोठा दगड घराच्या भिंतीला आदळल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसती, तरी घरात राहणारे ४ सदस्य आणि संपूर्ण राऊळ कुटुंब सध्या प्रचंड भीती आणि दहशतीखाली वावरत आहे.
घटनेची माहिती मिळताच गावचे तलाठी, सरपंच आणि पोलीस पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा सुरू केला आहे. या संपूर्ण परिस्थितीची गंभीर दखल घेत नेरूर मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि आज एक धडक पत्रकार परिषद घेऊन प्रशासकीय अनास्थेवर तीव्र शब्दांत प्रहार केला.

…तर मुहूर्तळी वाडीचे ‘माळीण’ होईल!
पत्रकार परिषदेत बोलताना रुपेश पावसकर यांनी अत्यंत भीतीदायक वास्तव समोर आणले. ते म्हणाले, “सध्या त्या उंच डोंगराळ भागावर तीन मोठे दगड अत्यंत धोकादायक स्थितीत अडकलेले आहेत. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हे दगड कधीही खाली घसरू शकतात. प्रशासनाने तात्काळ पावले उचलली नाहीत, तर येथे ‘माळीण’ सारखी मोठी दुर्घटना घडू शकते. तसे झाल्यास या वाडीची आणि लोकांच्या जिवाची जबाबदारी नक्की कोण घेणार?”
त्यांनी पुढे सांगितले की, ज्या ठिकाणी दरड कोसळली आहे, तिथे यापूर्वी बेकायदेशीरपणे माती उत्खननाचे प्रकार घडले होते. या संदर्भात आधीच तलाठ्यांकडे तक्रार नोंदवूनही महसूल विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळेच आज ही वेळ आली आहे.

विस्थापितांच्या राहण्या-जेवणाचा प्रश्न काय?
वालावल बंगे वाडीतील निलेश बंगे यांच्या घरामागील डोंगर खचल्याने प्रशासनाने त्यांना घर खाली करून स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत. यावर बोलताना पावसकर यांनी कुडाळ तहसीलदारांवर गंभीर आरोप केला. “तहसीलदार कार्यालयाकडून आपत्तीग्रस्तांना मदत करण्याऐवजी थेट ‘धमकीवजा’ पत्रे पाठवली जात आहेत. तुम्ही लोकांना घरे सोडायला सांगता, पण त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कोण करणार? तहसीलदार हे ‘न्याय दंडाधिकारी’ आहेत, लोकांनी तुमच्याकडे आशेने बघावे असे तुमचे वर्तन असायला हवे,” असे पावसकर म्हणाले.

प्रशासनाच्या रेंगाळणाऱ्या कारभारावर संताप व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, “माझी २०२५ सालची एक केस वर्ग-१ होण्यासाठी महसूल कार्यालयात पूर्ण एक वर्ष लागला. मी जिल्हा परिषद सदस्य असून जर मला एक वर्ष लागत असेल, तर सामान्य माणसाची काय अवस्था होत असेल?” तसेच, महसूलचे काही अधिकारी ठेकेदारांसोबत आर्थिक साटेलोटे करत असून, अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माझा मतदारसंघ डोंगर आणि नदी किनाऱ्यालगत असल्याने पावसाळ्यात येथे नेहमीच धोक्याची परिस्थिती असते. प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तातडीने उपाययोजना केल्या नाहीत आणि नागरिकांना सुरक्षितता दिली नाही, तर येत्या काळात प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा गर्भित इशारा रुपेश पावसकर यांनी दिला आहे.

शेअर करा