कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मुंबईकडे रात्री जाणारी कोकणकन्या एक्सप्रेस २ तास उशिराने धावणार
कुडाळ,दि.२७ जून
कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्याचा फटका शनिवार, २७ जून रोजी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मडगावकडे जाणाऱ्या गाडी क्रमांक २०१११ कोकणकन्या एक्सप्रेसला बसला. कुडाळ रेल्वेस्थानकावर सकाळी ८ वाजून २४ मिनिटांनी दाखल होणारी ही गाडी तब्बल ९ तास उशिराने संध्याकाळी ५.३५ वाजता कुडाळ स्थानकात पोहोचली. त्यामुळे प्रवाशांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. या विलंबामागे काल शुक्रवार, २६ जून रोजी मुंबईहून मडगावकडे जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमध्ये झालेला तांत्रिक बिघाड कारणीभूत ठरल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतून सकाळी ७.०५ वाजता सुटलेल्या मांडवी एक्सप्रेसच्या थर्ड इकॉनॉमी एसी डब्यांतील एसी यंत्रणा खेड स्थानकापासूनच बंद पडली. त्यामुळे डब्यातील प्रवाशांची अक्षरशः घुसमट झाली. उकाड्यामुळे अनेक प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला आणि रेल्वे प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. यानंतर मांडवी एक्सप्रेस रत्नागिरी रेल्वे स्थानकात थांबवून इंजिन बदलण्यात आले. सुमारे २५ मिनिटांच्या थांब्यानंतर वातानुकूलन यंत्रणा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस उशिराने धावली आणि त्याचा परिणाम कोकण रेल्वेमार्गावरील इतर गाड्यांवरही झाला. परिणामी, कोकणकन्या एक्सप्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले.