Kudal News : महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात जांभवडे ग्रामपंचायत आक्रमक

शेअर करा

९ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

सरपंच अमित मडव यांचा इशारा:

वाढीव वीज बिले, कमी व्होल्टेज आणि असुरक्षित मुख्य वाहिनीमुळे ग्रामस्थांचा जीव टांगणीला

कुडाळ,दि.२८ ऑक्टोंबर

जांभवडे (ता. कुडाळ) ग्रामपंचायत आणि महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये गावातील गंभीर वीज समस्यांबाबत नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांच्या प्रश्नांवर अत्यंत संदिग्ध आणि उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. महावितरणच्या या उदासीन भूमिकेमुळे जांभवडे ग्रामपंचायत अत्यंत आक्रमक झाली असून, मागण्या मान्य न झाल्यास येत्या ९ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण छेडण्याचा थेट इशारा सरपंच अमित भालचंद्र मडव यांनी दिला आहे.
सुमारे १२० ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले
जांभवडे गावात सध्या वीज बिलांचा मोठा घोळ सुरू आहे. गावातील सुमारे १२० हून अधिक ग्राहकांना अतिशय वाढीव आणि फुगलेली वीज बिले आली आहेत. यामुळे सामान्य आणि शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून, ही अन्यायकारक बिले दुरुस्त करून मिळावीत अशी मागणी बैठकीत लावून धरण्यात आली.
उघड्या मुख्य वाहिनीमुळे अपघाताची भीती
गावातून जाणाऱ्या महावितरणच्या मुख्य वीज वाहिनीला (मेन लाईन) कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा अथवा संरक्षक कवच नाही. ही वाहिनी अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने एखादा मोठा अपघात घडून कोणाचाही जीव जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मानवी जिवाशी चाललेला हा खेळ तातडीने थांबवावा, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.
‘लो-व्होल्टेज’मुळे गाव अंधारात, उपकरणांचे नुकसान
वाढीव बिलांचा भुर्दंड सोसावा लागत असतानाच, गावात सर्वत्र ‘लो-व्होल्टेज’चा (कमी व्होल्टेज) गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे घरातील विद्युत उपकरणे बंद पडत असून ती जळण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतीचे पंप आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांवरही याचा विपरित परिणाम होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे.
अधिकाऱ्यांच्या उडवाउडवीनंतर आंदोलनाचे हत्यार
या सर्व समस्यांवर सरपंच अमित मडव व ग्रामपंचायत सदस्यांनी महावितरण अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. मात्र, अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस उपाययोजना न सांगता टोलवाटोलवीची उत्तरे दिली. त्यामुळे आता प्रशासनाला जागे करण्यासाठी जांभवडे ग्रामपंचायतीने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ९ नोव्हेंबरपर्यंत या २ वर्षापासून प्रलंबित मागण्यांवर लेखी आणि ठोस निर्णय न झाल्यास ग्रामपंचायतीच्या वतीने तीव्र उपोषण करण्यात येईल, असे सरपंच अमित मडव यांनी स्पष्ट केले आहे.

शेअर करा