Mumbai News : मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा!

शेअर करा

महाडीबीटी २.० प्रणालीवर मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा शुभारंभ; मच्छीमार, मत्स्यशेतकरी व व्यावसायिकांना घरबसल्या करता येणार अर्ज

मुंबई,दि.२८ ऑक्टोंबर

राज्यातील मच्छीमार, मत्स्यशेतकरी, मत्स्यव्यावसायिक आणि मच्छीमार संस्थांना शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ लाभार्थीभिमुख योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सुविधा सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे महाडीबीटी २.० प्रणालीवर ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’अंतर्गत या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला.

राज्य शासनाकडून ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ प्रभावीपणे राबविण्यात येत असून, या योजनांच्या अंमलबजावणीतील प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी Government Process Re-engineering (GPR) अंतर्गत विविध सुधारणा करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लाभार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कमी कागदपत्रे, जलद सेवा आणि पारदर्शक प्रक्रिया

या ऑनलाइन सुविधेमुळे लाभार्थ्यांना शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार जाण्याची आवश्यकता कमी होणार आहे. तसेच अनावश्यक ऑफलाइन कागदपत्रे सादर करण्याची गरज राहणार नाही. आवश्यक माहिती शासकीय डेटाबेसमधून उपलब्ध करून देण्यासह विविध प्रमाणपत्रे ऑनलाइन स्वरूपात मिळविण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

योजनेंतर्गत मंजूर होणारे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात जमा केले जाणार आहे. त्यामुळे अनुदान वितरण प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास मदत होणार असून, लाभार्थ्यांना योजनांचा लाभ अधिक सुलभतेने घेता येणार आहे.

मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील विविध घटकांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार असून, अर्ज प्रक्रिया सुलभ करणे, कागदपत्रांची पूर्तता कमी करणे आणि सेवा वितरणाचा वेग वाढविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

ऑनलाइन अर्जासाठी संकेतस्थळ

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजनांसाठी अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांनी महाडीबीटी २.० च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

🔗 https://mahadbt2.maharashtra.gov.in/

शेअर करा