आरोग्य व शिक्षण समिती सभापती प्रितेश राऊळ आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांच्याकडून पावशी शाळेत पाहणी
सिंधुदुर्ग,दि.२८ ऑक्टोंबर
राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात 27 ऑक्टोबर 2026 रोजी राबविण्यात आलेल्या मोहिमेत 1 लाख 10 हजार 344 बालकांना अल्बेंडाझोल जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील मोहिमेची एकूण कामगिरी 95.53 टक्के नोंदविण्यात आली असून, मोहिमेदरम्यान कोणतीही प्रतिकूल घटना (AEFI) नोंदविण्यात आलेली नाही.
या मोहिमेच्या अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती प्रितेश राऊळ आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पावशी नं. 1 येथे भेट दिली. यावेळी त्यांनी मोहिमेच्या नियोजनाचा व कार्यवाहीचा आढावा घेतला आणि आवश्यक सूचना दिल्या. पात्र बालकांना जंतनाशक गोळ्यांचा लाभ मिळावा, यासाठी आरोग्य, शिक्षण तसेच महिला व बालविकास विभागातील अधिकारी-कर्मचारी, शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांनी समन्वयाने काम केले.
कणकवली तालुक्यात सर्वाधिक कामगिरी
जिल्ह्यातील तालुकानिहाय कामगिरीमध्ये कणकवली तालुक्याने 113.97 टक्के, दोडामार्गने 108.48 टक्के, कुडाळने 96.11 टक्के, सावंतवाडीने 90.78 टक्के, मालवणने 88.86 टक्के, देवगडने 88.53 टक्के, वैभववाडीने 85.63 टक्के, तर वेंगुर्ला तालुक्याने 83.63 टक्के कामगिरी नोंदविली आहे.
मोहिमेत 53 हजार 701 मुलींना आणि 56 हजार 641 मुलांना, अशा एकूण 1 लाख 10 हजार 344 बालकांना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या.
3 नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिन
मोहिमेदरम्यान ज्या पात्र बालकांना जंतनाशक गोळ्या मिळालेल्या नाहीत, अशा बालकांना 3 नोव्हेंबर 2026 रोजी आयोजित मॉप-अप दिनी गोळ्या देण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित बालकांच्या पालकांनी शिक्षक, अंगणवाडी सेविका किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
बालकांचे आरोग्य सुदृढ राखणे, जंतसंसर्गाचा धोका कमी करणे आणि निरोगी बालपण सुनिश्चित करणे हा राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग, शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आणि पालकांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरत आहे.